
बीड, 26 फेब्रुवारी (हिं.स.)। लोकसभा सचिवालयाच्या वतीने भारत-उझबेकिस्तान संसदीय मैत्री गटाची १८व्या लोकसभेसाठी स्थापना करण्यात आली असून, या गटात बीडचे खासदार बजरंग मनोहर सोनवणे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकसभा सचिवालयाच्या परिषद व प्रोटोकॉल शाखेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्राद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. लोकसभेचेअध्यक्ष यांच्या मान्यतेने खासदार बजरंग सोनवणे यांची भारत-उझबेकिस्तान संसदीय मैत्री गटाच्या सदस्यपदी नामनिर्देशित करण्यात आले असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या दोन्ही देशांमधील संसदीय सहकार्य वाढविणे, परस्पर संबंध अधिक दृढ करणे, सांस्कृतिक, आर्थिक व राजनैतिक देवाणघेवाण मजबूत करणे या उद्देशाने संसदीय मैत्री गट कार्यरत असतात. या माध्यमातून दोन्ही देशांतील संसदीय प्रतिनिधींमध्ये संवाद आणि सहकार्य वाढण्यास मदत होणार आहे. या निवडीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थानिक प्रश्न मांडण्याची तसेच देशाच्या परराष्ट्र धोरणाशी संबंधित विषयांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची संधी खा. बजरंग सोनवणे यांना उपलब्ध होणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis