
पुणे, 26 फेब्रुवारी, (हिं.स.)बोपोडी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले याचा आदेश रद्द करण्यासाठी लावण्यात आलेली सुनावणी आता १८ मार्च रोजी होणार आहे. ही सुनावणी बुधवारी (दि. २५) होणार होती मात्र, दोन्ही बाजुंकडील पक्षकार सुनावणीस अनुपस्थित राहिल्याने ही सुनावणी तीन आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
बोपोडी येथील कृषी महाविद्यालयाच्या मालकीच्या जमिनीवर तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी कुळांची नावे लावण्याचा आदेश दिला होता. हा प्रकार जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर तातडीने त्याविषयीचे फेरफार अंमलात येणार नाहीत यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधितांना निर्देश दिले होते. त्यानंतर येवले यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र, त्यानंतर येवले यांचे आदेश नियमानुसार रद्द करण्याची गरज होती. त्यानुसार पुण्याचे उपविभागीय अधिकारी सुनील जोशी यांनी सुनावणी घेण्यासाठी कृषी महाविद्यालय आणि दुसरे पक्षकार हेमंत गवंडे आणि विध्वांस कुटुंबीयांना नोटीस बजावली. मात्र, गवंडे आणि विध्वांस कुटुंबियांनी जोशी यांच्या सुनावणीवर आक्षेप घेत त्रयस्थ अधिकाऱ्याकडून सुनावणी घेण्याची मागणी अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत यांच्याकडे केली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु