
* पुलावर बांधण्यात आलेल्या दोन्ही भिंती एजन्सीच्या कामात मुख्य अडथळा
अमरावती, 26 फेब्रुवारी (हिं.स.)।
राजकमल रेल्वे उड्डाण पुलाचे घोडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगीसाठी अडले आहे. २४ ऑगस्ट २०२५ रोजी आरओबी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. परिणामी शहरवासीयांना श्यामनगर ,रुक्मिणी नगर,काँग्रेसनगर कडे यायचे असल्यास किंवा राजकमल चौक, श्री अंबादेवी मंदिर परिसरासह जुन्या अमरावती शहरात जायचे असल्यास किमान दोन ते तीन कि.मी. अतिरिक्त फेरा घेऊन जावे लागते. त्यामुळे इतर रस्त्यांवरील ताण वाढून शहरात वाहतुकीच्या कोंडीची समस्याही निर्माण झाली आहे.
हा पुल शहराची लाईफलाईन असून, ६ महिने झाले तरी जनप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनासह, पीडब्ल्यूडीच्या उदासीनतेमुळे अद्याप तो पाडण्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे साहजिकच नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. सर्वसामान्यांना दररोज इंधन, वेळ, पैसा खर्च करून तसेच वाहतुकीच्या कोंडीचा सामना करून राजकमल चौक, जुऱ्या अमरावती शहरात, श्री अंबादेवी मंदिरासह बाजारपेठेत जावे लागते. तसेच ज्यांना जुन्या अमरावती शहराकडून रुक्मिणीनगर, काँग्रेसनगर, मध्यवर्ती बस स्थानकाकडे यायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर इर्विन चौकाकडून वळसा देत परत यावे लागते. यात सर्वांचा उगाच वेळ, इंधन, पैसा वाया जात आहे. राजकीय नेते पुलाचे काम सुरू होणार, अशी हवाई फटकेबाजी करीत असले तरी अद्याप पुलाचे काम सुरू झाले नाही. कहर म्हणजे मध्ये रेल्वेच्या भुसावळ कार्यालयाने पुल पाडण्यासाठी एजन्सीची नियुक्ती केली असून या एजन्सीने कम्प्रेसरसह इतर आवश्यक साहित्य आणून ठेवले आहे. परंतु, जोवर पीडब्ल्यूडी काम सुरू करण्याची परवानगी देणार नाही, तोवर त्यांचाही नाईलाज झाला आहे. कोणत्या कारणास्तव पीडब्ल्यूडीने परवानगी रोखून ठेवली, हे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनाही कळेनासे झाले आहे.
जेवढ्या लवकर हा पुल पाहून त्या जागी नवा पुल तयार होईल, तेवढाच शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे. सोबतच शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्नही सुटेल. सध्या हा पुल बंद असल्यामुळे शहराच्या दोन भागाचा थेट संपर्क तुटला आहे.
मनपा निवडणुकीआधी तत्काळ पुलाचे काम सुरू करू, असे आश्वासन मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांनी दिले होते. मनपा निवडणूक आटोपून आता दीड महिना झाला तरी अद्याप काम सुरू झाले नाही. पालकमंत्र्यांनी या कामी हस्तक्षेप करावा. पुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी शहरवासी करीत आहेत.
राजकमल रेल्वे उड्डाण पुलावर कोणीही बळजबरीने वाहन नेऊ नये तसेच पुल खचून कोणातही धोका होऊ नये, म्हणून पुलाच्या दोन्ही बाजुला प्रत्येकी ५ फुटाच्या भिंती उभारण्यात आल्या आहेत. या दोन्ही बाजुला असलेल्या भिंती तोडल्यानंतरच पुल पाडण्याचे काम मार्गी लागणार आहे. तेथे मशीन्स व इतर साहित्य नेता येईल. पुलावर बांधण्यात आलेल्या दोन्ही भिंती एजन्सीच्या कामात मुख्य अडथळा ठरल्या आहेत. जोवर पीडब्ल्यूडी त्या पाडत नाही. तोवर काम सुरू होणार नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी