
अमरावती, 26 फेब्रुवारी (हिं.स.)
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा पदव्युत्तर मराठी विभाग आणि विदर्भ साहित्य संघ शाखा अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर दृकश्राव्य सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमात ‘महाभारतातील कृष्ण’ या विषयावर अभ्यासक डॉ. विनोद कोलवाडकर (अमरावती) मार्गदर्शन करणार आहेत. भारतीय महाकाव्य परंपरेतील महाभारत हा ग्रंथ मानवी मूल्ये, धर्म-अधर्माचा संघर्ष, नैतिकता आणि तत्त्वचिंतन यांचे गहन दर्शन घडवतो. त्यातील कृष्ण ही व्यक्तिरेखा केवळ धार्मिक प्रतीक नसून एक कुशल राजकारणी, तत्त्वज्ञ, कर्तृत्ववान मार्गदर्शक आणि मानवी मनाचा अभ्यास करणारी बहुआयामी प्रतिमा म्हणून ओळखली जाते. या अनुषंगाने होणारे व्याख्यान विद्यार्थ्यांसह साहित्यप्रेमींसाठी ज्ञानवर्धक ठरणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. डॉ. मिलिंद बारहाते भूषविणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून दै. हिंदुस्थानचे प्रबंध संपादक श्री. विलास मराठे यांची उपस्थिती लाभणार आहे. ‘मराठी भाषा गौरव दिन’ हा मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा आणि साहित्यवैभवाचा गौरव करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. भाषेच्या जतन, संवर्धन आणि अभिवृद्धीसाठी अशा प्रकारचे शैक्षणिक उपक्रम महत्त्वपूर्ण मानले जातात. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमातून मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांविषयी विद्यार्थ्यांना अधिक सहज करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विभागप्रमुख प्रा. डॉ. मोना चिमोटे यांनी सर्व विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक तसेच साहित्यप्रेमींना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी