
अमरावती, 26 फेब्रुवारी (हिं.स.)
जिल्हा परिषद, पंचायत समित्यानिवडणुका पुन्हा लांबल्याने जिल्हा परिषद पंचायत समिती इच्छुकांमध्ये निराशा झाली असली, तरी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आगामी ग्रामपंचायतवर आपलेच वर्चस्व निर्माण करण्यासाठी जि. प. इच्छुक उमेदवार व गावातील पुढारी गावात लक्ष घालताना दिसत आहेत. त्यामुळे आता वॉर्ड रचना कशी होते, आरक्षण कोणते निघते, याचे वेध त्यांना लागले आहे.सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर 'कही खुशी कही गम' अशी परिस्थिती बहुसंख्य ठिकाणी निर्माण झाली आहे. थेट जनतेतून सरपंच असल्याने निवडणुका आता पहिल्यासारख्या सोप्या राहिल्या नाहीत. त्यातच गाव-गाड्यातील वॉर्ड रचना आणि आरक्षणाची धास्ती या पुढाऱ्यांनी घेतली आहे. गाव-गाड्यातील प्रत्येक वाँडांत अल्पसंख्याक असला, तरीही मूळ ओबीसी मतदार हा निकालावर प्रभाव टाकू शकतो. त्यामुळे त्याला गोंजारत असताना अनेक जण ग्रामपंचायत सदस्यपदासाठीदेखील दावेदारी करू शकतात आणि असा काही वाद निर्माण झाला, तर त्याचे थेट परिणाम सरपंचाच्या निवडीवर होऊ शकतात. त्यामुळे कोणाला शब्द द्यायचा,कोणाला तयारीला लागा म्हणायचे, हे देखील गावगाड्यातील धुरंधरांना पहिल्या चरणात तरी बोलता येत नसल्याचे वास्तव आहे.
पॅनलमध्ये कार्यकर्ता की सोयरा?
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अनेकांना भाग घेण्याची मनीषा असल्याने व बहुतांशी एक-दुसऱ्याचे सगे-सोयरे असल्याने कुणी थांबायचं आणि कुणी लढायचं, हादेखील प्रश्न निर्माण होणार आहे. आपल्याला अपेक्षित असणारी वॉर्ड रचना व आरक्षण वॉर्डात निघाले तरीही आपल्या पॅनलमध्ये कार्यकर्त्याला घ्यायचं की सोयरा जवळ करायचा, असा मोठा प्रश्न या निवडणुकीत निर्माण होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी