
पुणे, 26 फेब्रुवारी (हिं.स.)महाबिजच्या वतीने कृषी विभागामार्फत शेतकरी गटांना देण्यात आलेले परभणी शक्ती हे ज्वारी बियाणे निकृष्ट निघाले. यामुळे भोर तालुक्यातील २४ गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. बियाणांच्या ताटव्यांची वाढच न झाल्याने ज्वारी तर नाहीच शिवाय गुरांच्या चाऱ्यासाठीचा कडबा देखील उपलब्ध होणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
एकरी २८ हजार रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी संतप्त शेतकरी करीत आहेत.भोर तालुक्यातील २४ गावांमध्ये महाबिजने ज्वारी एकरी चार किलोप्रमाणे गटाच्या २५ शेतकऱ्यांना बियाणे दिले होते. त्याची पेरणी साहाय्यक कृषी अधिकारी यांच्या तांत्रिक मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी केली होती. या बियाणांची उगवण झाली परंतु दोन ते अडीच महिने झाले तरी त्या ज्वारीची अपेक्षीत वाढ झाली नाही. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत तालुका कृषी विभाग व महाबिज यांच्याकडे तक्रार केली. रब्बीचा वाया गेलेला हंगाम, ज्वारी उत्पादन व जनावरांचा चारा याला फटका बसला आहे. त्यामुळे भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.ज्वारीची अधारभूत किंमत तीन हजार ७४९ प्रतिक्विंटल आहे. कडब्याचा समावेश करून शेतकऱ्यांचे एकरी २८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. महाबिजच्या बियाणामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम वाया गेला आहे. त्याची तातडीने दखल घेऊन नुकसान भरपाई देवी. अन्यथा शेतकऱ्यांसमवेत रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल ,असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु