
बीड, २८ फेब्रुवारी (हिं.स.) : परळी शहर पोलिसांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करत तब्बल २ लाख ९७ हजार २०० रुपये किमतीचे १२ हरवलेले मोबाईल शोधून काढत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शोधून काढलेले सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले असून, त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मोबाईल हरवल्यानंतर अनेक नागरिकांनी पोलिस ठाण्यात तक्रारी नोंदवल्या होत्या, तर काहींनी ‘सीईआयआर’ पोर्टलवर आपली माहिती नोंदवली होती. या तक्रारींच्या आधारे परळी शहर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. पोलिस उपनिरीक्षक अमोल शिंगणे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून १२ मोबाईल हँडसेटचा शोध लावला.
शोधण्यात आलेले हे महागडे मोबाईल सहायक पोलिस अधीक्षक ऋषिकेश शिंदे (उपविभाग, अंबाजोगाई) यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना वितरित करण्यात आले. यावेळी आपला हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिस प्रशासनाचे आभार मानले.
ही संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके, सहायक पोलिस अधीक्षक ऋषिकेश शिंदे आणि पोलिस निरीक्षक आर. के. नाचन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. परळी शहर पोलिसांच्या या तत्पर आणि प्रभावी कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis