
चंद्रपूर, 04 फेब्रुवारी (हिं.स.) । राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अस्थीकलश चंद्रपूर येथील श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात बुधवारी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. या वेळी आमदार किशोर जोरगेवार यांसह विविध राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
अस्थीकलशाचे दर्शन घेताना उपस्थितांनी अजितदादांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आदर व्यक्त केला. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष राजीव कक्कड, भारतीय जनता पक्षाचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री नामदेव डाहुले, घुग्घुस नगर परिषदेचे नगरसेवक आशिष मासिरकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष चारुशिला बारसागडे, कार्याध्यक्ष हेमांगिनी बिश्वास, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, युवक अध्यक्ष अभिनव देशपांडे, प्रतिमा ठाकूर आणि भरत गुप्ता उपस्थित होते.
आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले की, “उपमुख्यमंत्री अजितदादा आज आपल्यात नाहीत, हे स्वीकारणे अत्यंत कठीण आहे. त्यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरणारी आहे. स्पष्टवक्तेपणा, ठाम निर्णयक्षमता, प्रशासकीय अनुभव आणि जनतेशी असलेली घट्ट नाळ ही अजितदादांची खरी ओळख होती.” त्यांनी अजित पवार यांचे योगदान महाराष्ट्राच्या राजकारणात अजरामर असल्याचेही नमूद केले.यावेळी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीनेही त्यांच्या अस्थीकलशाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
-------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव