बांगलादेश : युनूस यांच्या निवासस्थानाबाहेर सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, अनेक जखमी
ढाका, 06 फेब्रुवारी (हिं.स.)।बांग्लादेशची राजधानी ढाका येथे शुक्रवारी शहराच्या मध्यवर्ती भागात हिंसक चकमकी घडल्या. नववा नॅशनल पे स्केल लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा, चीफ ॲडव्हायझर मोहम्मद युनूस यांच्या सरकारी निवासस
बांगलादेश: युनूस यांच्या निवासस्थानाबाहेर सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, अनेक जखमी


ढाका, 06 फेब्रुवारी (हिं.स.)।बांग्लादेशची राजधानी ढाका येथे शुक्रवारी शहराच्या मध्यवर्ती भागात हिंसक चकमकी घडल्या. नववा नॅशनल पे स्केल लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा, चीफ ॲडव्हायझर मोहम्मद युनूस यांच्या सरकारी निवासस्थान ‘जमुना’बाहेर पोलिसांशी संघर्ष झाला. या झटापटीत अनेक जण जखमी झाले आहेत.

या हिंसाचाराच्या घटनेला शुक्रवारी सकाळी सुरुवात झाली. देशभरातून आलेले आंदोलनकर्ते शहीद मीनार येथे एकत्र जमले आणि तेथून जमुनाच्या दिशेने मोर्चा काढण्यात आला. नवव्या राष्ट्रीय वेतन आयोगाच्या अहवालाच्या आधारे गॅझेट तातडीने प्रसिद्ध करून तो लागू करावा, अशी त्यांची मागणी आहे.

“पोटात भात नाही, तोंडात कसा विकास?” अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी सरकारवर त्यांच्या उदरनिर्वाहच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. सकाळी साडेअकराच्या सुमारास शाहबाग येथे आंदोलनकर्त्यांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले आणि जमुना प्रवेशद्वाराकडे मोर्चाला सुरुवात केली. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी वॉटर कॅनन, अश्रुधुराचे गोळे आणि साउंड ग्रेनेडचा वापर केला, तसेच लाठीचार्ज केला.

आंदोलनकर्ते निवासस्थानापर्यंत पोहोचू नयेत यासाठी वर्दीधारी सैनिकांनाही तैनात करण्यात आले होते. वृत्तांनुसार, संघर्ष तीव्र झाल्याने अनेक जण जखमी झाले. दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकारी, डेप्युटी कमिशनर मसूद आलम यांनी एका आंदोलनकर्त्याला, “तू निवडणुकीत गोंधळ घालायला जमुनाला आला आहेस का?” असा प्रश्न विचारताच तणाव आणखी वाढला.

सरकारी कर्मचाऱ्यांनी सांगितले की पोलिसांची सततची कारवाई गंभीर राजकीय परिणाम घडवू शकते. एका आंदोलनकर्त्याने म्हटले, “जर हल्ले सुरूच राहिले तर आम्ही निवडणुकांवर बहिष्कार टाकू.” पोलिसांनी मात्र परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत शाहबाग आणि जमुना परिसरात तणावपूर्ण वातावरण कायम होते, मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली होती आणि अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते.

दरम्यान, ही हिंसाचाराची घटना सार्वत्रिक निवडणुकीच्या अवघ्या सहा दिवस आधी घडली आहे. यापूर्वी झालेल्या हिंसाचारामुळे तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना पद सोडावे लागले होते आणि त्या भारतात आल्या होत्या. त्यानंतर युनूस यांच्या नेतृत्वाखाली काळजीवाहू (केअरटेकर) सरकार स्थापन करण्यात आले, ज्यांनी निष्पक्ष आणि मुक्त निवडणुका घेण्याचे आश्वासन दिले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande