पाकिस्तान-अफगाणिस्तान शांततेसाठी तुर्कियेकडून मध्यस्थीचा प्रस्ताव
इस्लामाबाद , 05 मार्च (हिं.स.)।पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावादामुळे सुरू असलेल्या चकमकी आता सहाव्या दिवशी पोहोचल्या आहेत. तरीही दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूच आहेत. दरम्यान, या प्रकरणात आता तुर्कियेची एंट्री झाली आहे. तुर्कियेचे राष्ट्राध्
पाकिस्तान-अफगाणिस्तान शांततेसाठी तुर्कियेकडून मध्यस्थी करण्याची ऑफर


इस्लामाबाद , 05 मार्च (हिं.स.)।पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावादामुळे सुरू असलेल्या चकमकी आता सहाव्या दिवशी पोहोचल्या आहेत. तरीही दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूच आहेत. दरम्यान, या प्रकरणात आता तुर्कियेची एंट्री झाली आहे. तुर्कियेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी दोन्ही देशांमध्ये नव्या युद्धविरामासाठी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

तुर्कियेच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाच्या माहितीनुसार, एर्दोगान यांनी फोनवर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांचा निषेध केला आणि तुर्किये पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यात पुन्हा युद्धविराम प्रस्थापित करण्यासाठी मदत करेल, असे सांगितले.

मात्र पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने या प्रस्तावाची थेट पुष्टी केली नाही. त्यांनी एवढेच सांगितले की दोन्ही नेत्यांमध्ये 2,611 किलोमीटर लांबीच्या अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेजवळ वाढत असलेल्या तणावावर चर्चा झाली आणि प्रदेशात शांतता व स्थिरतेसाठी संपर्क कायम ठेवण्यावर सहमती झाली.

दुसरीकडे या प्रस्तावावर अफगाणिस्तानातील तालिबान सरकारकडून अद्याप कोणतीही तातडीची प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र मागील आठवड्यात तुर्कियेचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी यांच्याशी सीमावर्ती परिस्थितीवर चर्चा केली होती.

दरम्यान, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी म्हटले की पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये शांतता तेव्हाच शक्य आहे, जेव्हा अफगाण तालिबान पाकिस्तानविरोधी दहशतवाद्यांशी आपले संबंध तोडेल. त्यांनी इशारा दिला की पाकिस्तान आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक ते सर्व पावले उचलेल.

सीमेजवळील ही लढाई प्रामुख्याने पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान भागात सुरू आहे. दोन्ही देश एकमेकांना मोठे नुकसान केल्याचा दावा करत आहेत. मात्र माध्यमांना या भागात मर्यादित प्रवेश असल्यामुळे या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी होऊ शकलेली नाही.अशा परिस्थितीत अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला की मागील पाच दिवसांत 150 पाकिस्तानी सैनिक मारले गेले, तर 28 अफगाण सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे पाकिस्तानचे माहिती मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी सांगितले की मागील सहा दिवसांत 481 अफगाण सैनिक मारले गेले आहेत. पाकिस्तानचा आरोप आहे की अफगाणिस्तानच्या भूमीवरून तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) सारखे उग्रवादी संघटन पाकिस्तानमध्ये हल्ले करत आहेत. मात्र काबूल सरकारने हे आरोप फेटाळले असून त्यांच्या भूमीचा वापर कोणत्याही दुसऱ्या देशाविरुद्ध होऊ दिला जात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मागील आठवड्यात या संघर्षाची सुरुवात झाली, जेव्हा अफगाणिस्तानने गुरुवारी पाकिस्तानवर हल्ले केले. हे हल्ले पाकिस्तानने मागील आठवड्याच्या शेवटी केलेल्या हवाई हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात करण्यात आल्याचे सांगितले गेले. त्यानंतर पाकिस्तानने सीमेजवळ लष्करी कारवाई सुरू केली आणि अफगाणिस्तानसोबत जवळपास खुले युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हटले. यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायात चिंता वाढली आहे.

याआधी ऑक्टोबर 2024 मध्ये दोन्ही देशांमध्ये कतार आणि तुर्किये यांच्या मदतीने युद्धविराम झाला होता. त्या करारानंतर इस्तांबुल येथे सहा दिवस चर्चा झाली होती आणि नोव्हेंबरमध्ये तिसऱ्या टप्प्यातील चर्चेला सहमतीही झाली होती. मात्र 6 आणि 7 नोव्हेंबर रोजी झालेल्या चर्चेत कोणताही ठोस निष्कर्ष निघाला नाही आणि शांतता प्रक्रिया थांबली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande