
डोंबिवली, 08 फेब्रुवारी, (हिं.स.)। टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया संस्थेतर्फे पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत फेडरेशनच्या ''नॅशनल प्रेसिडेंट पदी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची अधिकृत निवड करण्यात आली. निवडीनंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधून या पदावर निवड केल्याबद्दल फेडरेशनच्या सर्व सदस्यांचे आभार मानले.
कल्याण लोकसभा मतदारसंघात टेनिस क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळले जाते. इथे सातत्याने मोठ्या संख्येने टुर्नामेंट्स आयोजित केल्या जातात आणि असंख्य तरुण या खेळाशी जोडले गेले आहेत. याच पद्धतीने विविध जिल्ह्यांमध्ये ही टेनिस क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळले जाते. याच पार्श्वभूमीवर या खेळाला अधिक संघटित, शिस्तबद्ध आणि व्यावसायिक दिशा देण्याची गरज होती. ITCSF च्या माध्यमातून आज एक नवी, सकारात्मक सुरुवात होत आहे.
या फेडरेशनद्वारे टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना विश्वासार्ह व्यासपीठ मिळणार आहे. खेळाडूंनी केवळ छंद म्हणून नव्हे, तर एक करिअर म्हणून टेनिस क्रिकेटकडे पाहावे, या उद्देशाने फेडरेशन भविष्यात काम करणार आहे.
या फेडरेशनच्या माध्यमातून देशभरातून अनेक नवे, गुणवान खेळाडू घडतील. खेळाडूंना योग्य मार्गदर्शन, संधी आणि पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली रचना कशी उभी करता येईल, यासाठी उपाययोजना राबविण्यात येतील, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या प्रवासात सर्व खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा प्रेमी यांचे सहकार्य मोलाचे ठरेल, असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. टेनिस फेडरेशनचे विविध राज्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य आणि विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi