
- टीम इंडियाची अमेरिकेवर 29 धावांनी मात- कर्णधार सूर्यकुमार विजयाचा शिल्पकार
मुंबई, 07 फेब्रुवारी (हिं.स.)२०२६ च्या टी-२० विश्वचषकातील तिसऱ्या सामन्यात अमेरिकन क्रिकेट संघाने जगातील अव्वल क्रिकेट संघ भारताला पहिल्याच सामन्यात चांगलंचं झुंजवलं. सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्स इनिंगमुळे भारताला हा विजय साकारता. आला. आणि अमेरिकेला २९ धावांनी पराभूत करत टीम इंडियाने टी-20 विश्वचषकात विजयी सलामी दिली. सूर्यकुमार यादवने नाबाद ८४ धावांची खेळी केली आणि त्याला सामनावीराचा किताब देऊन गौरविण्यात आले.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात, भारतीय संघाच्या १६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेची आघाडीची फळी डळमळीत झाली. सलामीवीर आंद्रियास गौस (६), सैतेजा मुक्काल्ला (२) आणि कर्णधार मोनांक पटेल (२) हे धावा न करता बाद झाले. १३ धावांत ३ बळी गमावल्यानंतर, अमेरिकेला मिलिंद कुमार आणि संजय कृष्णमूर्ती यांनी चौथ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी करून संघाची धावसंख्या ७१ पर्यंत नेली. मिलिंद ३४ धावांवर बाद झाला. त्यानंतर संजय कृष्णमूर्ती ३७ धावांवर बाद झाला. यानंतर अमेरिकेचे फलंदाज फारशी कमाल करु शकले नाहीत. शुभम रंजनेच्या २२ चेंडूंत ३७ धावा असूनही, अमेरिकेला २० षटकांत ८ विकेट्स गमावून फक्त १३२ धावा करता आल्या आणि त्यांनी २९ धावांनी सामना गमावला. भारताकडून मोहम्मद सिराजने ४ षटकांत २९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंगने ४ षटकांत १८ धावा देत २ विकेट्स घेतल्या, अक्षर पटेलने ४ षटकांत २४ धावा देत २ फलंदाजांना बाद केले आणि वरुण चक्रवर्तीने ४ षटकांत २४ धावा देत एक विकेट घेतली.
अमेरिकेच्या संघात कर्णधार मोनांक पटेलसह पाच भारतीय क्रिकेटपटू आहेत, त्यापैकी तिघांनी मुंबईच्या या मैदानावर क्रिकेट खेळले आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर मोनांकने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सौरभ नेत्रावलकर वगळता इतर अमेरिकन गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी केली. कर्णधार मोनांकनेही क्षेत्ररक्षण खूप चांगले केले होते. दरम्यान, भारतीय फलंदाजांना चेंडू उसळी घेईल अशी अपेक्षा होती आणि ते त्यांच्या आक्रमक फलंदाजीने त्याचा फायदा घेऊन तो स्टेडियमबाहेर पाठवतील. पण तसे झाले नाही. चेंडू मंद गतीने येत होता आणि एकामागून एक, भारतीय फलंदाज बाद झाले. सहा फलंदाज तर दुहेरी आकड्यापर्यंतही पोहोचू शकले नाहीत. त्यापैकी तीन एकही धाव करू शकले नाहीत. कर्णधार सूर्यकुमार यादव हा एकमेव क्रिकेटपटू होता ज्याने त्याचा धडा घेतला आणि शेवटच्या चेंडूपर्यंत तो मैदानावर टिकून राहिला.
भारताला अभिषेक शर्माकडून चांगली सुरुवात मिळेल अशी आशा होती, पण तो शून्यावर बाद झाला. भारताने ५.१ षटकांत एक विकेट गमावून ४५ धावा केल्या होत्या, पण पॉवरप्लेमध्ये भारतीय संघाला चार विकेट्स गमावून फक्त ४६ धावा करता आल्या. वेनने त्या षटकात इशान किशन (२०), तिलक वर्मा (२५) आणि शिवम दुबे (०) यांना बाद केले.भारताने १४ षटकांत सहा विकेट गमावून ८६ धावा केल्या होत्या. ब्रेक दरम्यान प्रशिक्षक गौतम गंभीर आले आणि त्यांनी सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांच्याशी बोलले. त्यानंतर सूर्याने आपला खेळ बदलला. शुभम रंजने आणि हरमीत सिंग, जे एकेकाळी सूर्यासोबत त्याच मैदानावर खेळत होते, त्यांनीही भारतीय संघाला त्रास देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. एका बाजूला विकेट पडत असताना सूर्याने एक बाजू लावून धरली होती. त्याने शेवटच्या षटकात आपल्याकडे स्ट्राइक कायम ठेवली आणि २१ धावा करून धावसंख्या १६० च्या पुढे नेली.
कर्णधार सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूत ८४ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने १० चौकार आणि ४ षटकार मारले. उपकर्णधार अक्षर पटेलने १४ धावांचे योगदान दिले. रिंकू सिंगने ६ धावांचे योगदान दिले आणि हार्दिक पंड्याने ५ धावांचे योगदान दिले. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने ४ धावा केल्या. अमेरिकेकडून शेडली व्हॅन शाल्कविकने ४ विकेट्स घेत टीम इंडियाला चांगलेच अडचणीत आणले. आता भारताचा सामना १० फेब्रुवारी रोजी नामिबियाशी होणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे