
नवी दिल्ली, 05 मार्च (हिं.स.)अमेरिका आणि इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात गोंधळ उडाला आहे. या संघर्षामुळे आखाती देशांमधील विमानतळांवर मोठ्या संख्येने लोक अडकले आहेत. आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे लोकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागला आहे. या संघर्षामुळे, भारत आणि श्रीलंकेने संयुक्तपणे आयोजित केलेल्या टी-२० विश्वचषकाच्या सुपर एटमध्ये स्थान मिळवल्यानंतर झिम्बाब्वे संघ मायदेशी परतू शकला नाही आणि भारतात अडकला. आता, आयसीसीच्या मदतीने, झिम्बाब्वे संघाची पहिली तुकडी त्यांच्या मायदेशी परतण्यासाठी रवाना झाली आहे.
टी-२० विश्वचषक झिम्बाब्वेसाठी संस्मरणीय होता. त्यांनी सुपर एटसाठी पात्र होण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेला पराभूत केले होते. पण त्यापलीकडे त्यांचा संघ आणखी पुढे मजल मारु शकला नाही. झिम्बाब्वेचा संघ २ मार्च रोजी भारतासाठी रवाना होणार होता. पण १ मार्च रोजी दिल्लीत दक्षिण आफ्रिकेकडून पाच विकेट्सने पराभव पत्करल्यानंतर तो तिथेच अडकला. अखेर आयसीसीने हस्तक्षेप केला आणि संघासाठी पर्यायी प्रवास योजनांची व्यवस्था केली, ज्यामुळे झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचू पहिली तुकडी अखेर रवाना झाली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वाहतूक अडचणींमुळे पर्यायी प्रवास व्यवस्था केल्यानंतर, २०२६ च्या टी२० विश्वचषकात सहभागी होणारा झिम्बाब्वेचा वरिष्ठ पुरुष संघ भारतातून मायदेशी परतत असल्याची पुष्टी झिम्बाब्वे क्रिकेटने केली आहे. विमानांची उपलब्धता आणि बदललेल्या मार्गामुळे, संघ टप्प्याटप्प्याने हरारेला परतेल असे त्यात म्हटले आहे. क्रिकेटपटूंची पहिली तुकडी भारतातून रवाना झाली, तर शेवटची तुकडी शुक्रवारी दुपारी रवाना होईल.
झिम्बाब्वे संघ दुबईमार्गे एमिरेट्सच्या विमानाने मायदेशी परतणार होता. पण मध्य पूर्वेतील संकटामुळे आखाती प्रदेशातील विमानसेवा विस्कळीत झाल्यानंतर त्यात बदल करावा लागला. झिम्बाब्वे संघ आता इथिओपियातील आदिस अबाबा मार्गे हरारेला जाईल. झिम्बाब्वेसोबतच वेस्ट इंडीज क्रिकेट संघही त्याच कारणास्तव भारतात अडकला आहे. पण त्यांच्या प्रवासाच्या योजनांबद्दल कोणतीही नवीन माहिती नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे