
बुमराह आणि अभिषेकबाबत प्रश्नचिन्ह कायम
मुंबई, 08 फेब्रुवारी (हिं.स.)टीम इंडियाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील त्यांच्या पहिल्या सामन्यात अमेरिकेला पराभूत करत विजय मिळवला. कर्णधार सूर्यकुमार यादवने ८४ धावांची नाबाद खेळी केली. पहिल्या सामन्यातील विजयानंतर, कर्णधार सूर्याने सांगितले की, वॉशिंग्टन सुंदर लवकरच संघात परतणार आहे. पण जसप्रीत बुमराह आणि अभिषेक शर्मा यांच्या प्रकृतीमुळे संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे.
टी-२० विश्वचषकात विजयाने मोहीम सुरू करणाऱ्या भारतीय संघासाठी दिलासादायक बातमी आली आहे. स्टार अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर लवकरच दिल्लीत संघात सामील होणार आहे. दिल्लीत भारत नामिबियाशी खेळणार आहे. अमेरिकेविरुद्धच्या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने खुलासा केला की, सुंदर तंदुरुस्त आहे आणि संघात सामील होण्यास तयार आहे.
वॉशिंग्टन सुंदर जवळजवळ एक महिना क्रिकेट मैदानापासून दूर होता. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजी करताना त्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो उर्वरित मालिकेतून आणि त्यानंतरच्या टी-२० सामन्यांमधून बाहेर पडला. अहवालांनुसार त्याला साइड स्ट्रेन आणि किरकोळ फ्रॅक्चर झाला होता आणि बंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे पुनर्वसन दरम्यान तो हळूहळू तंदुरुस्त झाला आहे.
जसप्रीत बुमराह आजारपणामुळे स्पर्धेतील पहिला सामना गमावला आणि अमेरिकेविरुद्धच्या सामन्याच्या दुसऱ्या डावात सलामीवीर अभिषेकही मैदानात उतरला नाही. तो भारतीय डगआउटमध्येही दिसला नाही. सूर्या म्हणाला, बुमराहला खूप ताप आला होता, तसेच अभिषेकलाही अस्वस्थ वाटत होते.
मोहम्मद सिराजने अभिषेकला पोटदुखी झाल्याचे उघड केले. पण नामिबियाविरुद्धच्या पुढील सामन्यासाठी तो परत येईल असे आश्वासन दिले. सिराजने असेही सांगितले की, सर्व काही ठीक आहे. त्याला थोडे पोटदुखी होती, म्हणूनच तो मैदानात उतरला नाही. तो पुढच्या सामन्यात परत येईल आणि बॅटने त्याची जादू दाखवेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे