
ढाका, 10 मार्च (हिं.स.)।बांग्लादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याकांविरोधातील हिंसाचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. गेल्या एका आठवड्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांत दोन हिंदूंची हत्या आणि एका मंदिरावर बॉम्बहल्ला झाल्याने परिस्थितीबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. मानवाधिकार संघटनांनी या घटनांना अत्यंत चिंताजनक ठरवत सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.
तज्ज्ञांच्या मते, अलीकडील राजकीय बदलांनंतर अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत नवे प्रश्न उपस्थित होत आहेत. अलीकडील घटनांमुळे बांग्लादेशातील अनेक भागांत हिंदू समाज स्वतःला असुरक्षित समजू लागल्याचे संकेत मिळत आहेत. एका बाजूला हत्यांच्या घटना समोर येत आहेत, तर दुसऱ्या बाजूला मंदिरात बॉम्ब फेकून धार्मिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मानवाधिकार संघटनांनी सरकारने दोषींविरुद्ध कठोर पावले उचलून अल्पसंख्याकांची सुरक्षा सुनिश्चित करावी, अशी मागणी केली आहे.
६ मार्चच्या रात्री बांग्लादेशातील बोगुरा जिल्ह्यात ४० वर्षीय चायोन राजभर यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. चायोन राजभर हे कोचिंग सेंटर चालवत होते आणि शिक्षण क्षेत्रातील कामांमुळे स्थानिक पातळीवर परिचित होते. अज्ञात हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर हल्ला करून घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती आहे. या घटनेमुळे स्थानिक हिंदू समाजात मोठी चिंता निर्माण झाली आहे.
७ मार्च रोजी कॉक्स बाजार जिल्ह्यात २९ वर्षीय गणेश पाल यांची हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे खंडणी मागितली जात होती आणि पैसे देण्यास नकार दिल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली. यापूर्वीही चिटगाव येथे खंडणीला विरोध केल्यामुळे आकाश दास यांची हत्या करण्यात आली होती. त्याच परिसरातील चंदनैश उपजिल्ह्यातील बदुरपारा येथे ७० वर्षीय चंदन दे यांना जनावरांची चोरी रोखण्याचा प्रयत्न केल्यामुळे मारहाण करून ठार करण्यात आले होते.
८ मार्चच्या संध्याकाळी कुमिला शहरातील कालीगाछ तळा काली मंदिरात पूजा सुरू असताना मुखवटा घातलेल्या हल्लेखोरांनी देशी बॉम्ब फेकले. या हल्ल्यात पुजारी केशब चक्रवर्ती यांच्यासह चार जण जखमी झाले. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. कुमिला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एमडी अनीसुज्जमां यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.
मानवाधिकार संघटना ‘बांग्लादेश जातीय हिंदू महाजोट’चे महासचिव मृत्युंजय कुमार राय यांनी या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सरकारने गुन्हेगारांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबावे, अशी मागणी केली. तसेच ‘महानगर पूजा उत्सव फ्रंट’चे संयोजक श्यामल कृष्ण यांनी या घटना समाजात अस्थिरता निर्माण करण्याच्या कटाचा भाग असू शकतात, असे सांगत दोषींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode