
सोलापूर, 10 मार्च (हिं.स.)।
उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. सोलापूरचा पारा ४० अंशांवर पोचल्याने जिल्हा रुग्णालयात उष्माघात प्रतिबंधक कक्ष सुरू करण्यात आला आहे. संभाव्य उष्माघात रुग्णांसाठी पाच खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. हवामान खात्याने पुढील तीन दिवसात तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून सोलापूरमध्ये तापमान सतत वाढत आहे. यामुळे नागरिकांना सकाळी आठनंतर घराबाहेर पडणे कठीण झाले असून, सायंकाळी तापमान काही प्रमाणात कमी होत आहे. रस्त्यावरील गर्दी कमी झाली आहे. अचानक झालेल्या तापमानवाढीमुळे उष्माघाताच्या संभाव्य रुग्णांसाठी गुरुनानक नगरातील जिल्हा रुग्णालयात कक्ष सुरू करण्यात आला आहे. पाच खाटा अशा रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी उन्हात काळजी घ्यावी.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड