
नवी दिल्ली, 10 मार्च (हिं.स.)। भारतीय रेल्वेने कार्यक्षमता तसेच मार्गांची वहन क्षमता वाढवण्यासाठी आणि संप्रेषण प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी एकूण 765 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान उन्नतीकरणाच्या कामांना मंजुरी दिली आहे. मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये दोन उच्च-घनता मालवाहतूक आणि प्रवासी मार्गांवरील इलेक्ट्रिक ट्रॅक्शन प्रणालीचे उन्नतीकरण तसेच पश्चिम रेल्वेच्या वडोदरा आणि मुंबई सेंट्रल विभागांमध्ये ऑप्टिकल फायबर संप्रेषण पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विस्तार यांचा समावेश आहे.
पूर्व किनारपट्टी रेल्वेअंतर्गत 106 किमी लांबीच्या दुव्वाडा–विशाखापट्टणम–विझियानगरम या मार्गावरील इलेक्ट्रिक ट्रॅक्शन प्रणाली उन्नत करण्यासाठी भारतीय रेल्वेने 318.07 कोटी रुपये मंजूर केले आहेत.दक्षिण मध्य रेल्वेच्या गुंतकल विभागांतर्गत कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील 126 किमी लांबीच्या रायचूर–गुंतकल मार्गावरील इलेक्ट्रिक ट्रॅक्शन प्रणाली उन्नत करण्यासाठी भारतीय रेल्वेने 259.39 कोटी रुपये मंजूर केले आहेत. पश्चिम रेल्वेच्या वडोदरा आणि मुंबई सेंट्रल विभागांमध्ये संप्रेषण पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी भारतीय रेल्वेने 187.88 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
या प्रकल्पांतर्गत 4×48 कोअर ऑप्टिकल फायबर केबल बॅकबोन प्रणाली बसविण्यात येणार असून त्यामुळे अधिक बँडविड्थ, नेटवर्कची पुनरावृत्ती क्षमता आणि एलटीई आधारित कवच तसेच इतर महत्त्वाच्या रेल्वे संप्रेषण प्रणालींना विश्वासार्ह आधार मिळणार आहे. या सुधारणेमुळे स्वदेशी ट्रेन टक्कर टाळणारी प्रणाली ‘कवच’ राबवण्यासाठी आवश्यक डिजिटल पायाभूत सुविधा अधिक सक्षम होणार आहे.
या कामांतर्गत एकूण 1,000 मार्ग किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यात येणार असून त्यापैकी 692 किमी वडोदरा विभागात आणि 308 किमी मुंबई विभागात असेल. मंजूर करण्यात आलेल्या या प्रकल्पांमुळे ट्रॅक्शन ऊर्जा प्रणाली सुधारून, संप्रेषण पायाभूत सुविधा बळकट करून आणि प्रमुख रेल्वे मार्गांवरील मालवाहतुकीची क्षमता वाढवून रेल्वेच्या कार्यक्षमतेत आणि विश्वासार्हतेत वाढ होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule