कोल्हापूर फर्स्टच्या वर्धापनदिनानिमित्त “स्वच्छ-सुंदर कोल्हापूर” उपक्रम
कोल्हापूर, 10 मार्च (हिं.स.)। शहराच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या कोल्हापूर फर्स्ट संस्थेच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त “स्वच्छ-सुंदर कोल्हापूर” या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. रेसिडेन्सी क्लब येथील झालेल्या कार्यक्रमात शहर
कोल्हापूर फर्स्ट मार्फत स्वच्छ, सुंदर कोल्हापूर उपक्रमात सहभाग


कोल्हापूर, 10 मार्च (हिं.स.)।

शहराच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या कोल्हापूर फर्स्ट संस्थेच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त “स्वच्छ-सुंदर कोल्हापूर” या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. रेसिडेन्सी क्लब येथील झालेल्या कार्यक्रमात शहरातील स्वच्छता व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेला चार स्विपिंग मशिन्स सुपूर्द करण्यात आल्या, तसेच सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणी उपक्रमाची घोषणा करण्यात आली.

यावेळी कोल्हापूर फर्स्ट चे चेअरमन सुरेन्द्र जैन व सर्व सलग्न संस्था अध्यक्ष यांचा उपस्थितीमध्ये महापौर सौ. रूपराणी निकम आणि महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना कोल्हापूर फर्स्टतर्फे तयार करण्यात आलेली कोल्हापूरच्या ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडविणारी विशेष फोटो फ्रेम देऊन सन्मानित करण्यात आले.

शहरातील स्वच्छतेसाठी स्विपिंग मशिन्स उपलब्ध करून देणारे सुरेन्द्र जैन, सचिन मेनन, भरत जाधव, नितीन वाडीकर तसेच शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणी करून देणारे सुरेन्द्र जैन, सचिन मेनन, भरत जाधव, जे. के. शाह, शंकर दुल्हाणी , गिरीश वझे यांचा महापौर व आयुक्त यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेन्द्र जैन यांनी केले, ते म्हणाले की, ९ मार्च २०२५ रोजी कोल्हापुरातील विविध नामांकित संस्था व निमंत्रित सदस्यांच्या सहभागातून कोल्हापूर फर्स्टची स्थापना करण्यात आली. कोल्हापूर फर्स्टने शाश्वत विकासासाठी विविध विषय हाती घेतले असून २०४७ पर्यंत विकसित भारत-विकसित कोल्हापूर या संकल्पनेनुसार काम सुरू आहे.

ते पुढे म्हणाले की, कोल्हापूरच्या विकासामध्ये महिला नेतृत्वाची मोठी भूमिका राहणार असून महिला शक्तीमुळे शहराचा विकास अधिक गतिमान होईल. शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी चार स्विपिंग मशिन्स महापालिकेला देण्यात आल्या असून, कोल्हापूर फर्स्ट हे पॉलिटिशन, प्रशासन, प्रेस व पब्लिक या ‘Four P’s’च्या माध्यमातून शाश्वत विकासासाठी प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी सांगितले. शहरातील स्वच्छता व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी पुढील काळातही टप्प्याटप्प्याने जेवढी स्विपिंग मशिन्स लागणार ते कोल्हापूर फर्स्ट मधील विशेष निमंत्रित सदस्य व सर्व सलग्न संस्थाचा सहकार्याने देण्यात येणार याची गवाही सुद्धा दिली. आज सहा सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणीची घोषणा करण्यात आली आहे. भविष्यात त्यामध्ये आणखी वाढ करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी कोल्हापूर फर्स्टच्या उपक्रमांचे कौतुक करताना शहर विकासासाठी विविध प्रकल्प राबविले जात असल्याचे सांगितले. शहर हद्दवाढ, महिला स्वच्छतागृह उभारणी, शाहू मिल मध्ये टेक्स्टाईल पार्क, पार्किंग व्यवस्था तसेच शहराचा विकास आराखडा यांसारख्या विविध कामांबाबत माहिती देत शहर विकासासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

महापौर रूपराणी निकम म्हणाल्या की, स्वच्छता मोहीम त्यांनी हाती घेतली आहे त्यामध्ये कोल्हापूर फर्स्ट तर्फे स्वच्छ सुंदर कोल्हापूर उपक्रम महापालिकेची मोहीम मध्ये मेलाचा दगड ठरणार आहे. कोल्हापूरच्या प्रवेशद्वारांवर शहराची वैशिष्ट्ये दर्शविणारी आयलँड उभारण्याचा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. तसेच शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कोल्हापूर इंजीनियरिंग असोसिएशन चे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते कोल्हापूर फर्स्टला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल चेअरमन सुरेन्द्र जैन यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

दरम्यान, कोल्हापूर फर्स्टमध्ये एकूण २२ संस्था संलग्न असून शाश्वत विकासासाठी एकत्रित प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमामध्ये कोल्हापूर प्रेस क्लब संस्थेचाही समावेश झाल्याबद्दल प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे व पत्रकार बांधवांचे महापौर व आयुक्त यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी कोल्हापूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांसह विविध संस्थांचे प्रतिनिधी, उद्योगपती व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande