
कोल्हापूर, 10 मार्च (हिं.स.)।
लहानपणापासून मी व माझे कुटुंबिय महावितरण परिवाराशी जोडले गेलेलो आहोत. महावितरणकडून कर्मचारी व कुटुंबियांकरीता आयोजित कार्यक्रमात मी सहभागी झालो आहे. तसेच महावितरणच्या शिष्यवृत्तीचाही मी लाभ घेतला आहे. त्यामुळेच माझ्या यशात महावितरणचाही वाटा आहे. असे भावनिक मत रोहित मालवेकर यांनी व्यक्त केले. वरिष्ठ यंत्रचालक तुकाराम मालवेकर यांचा मुलगा रोहित मालवेकर यांनी वयाच्या 27 व्या वर्षी युपीएससी यश संपादन केले. त्यानिमित्ताने झालेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
महावितरणमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील (ता.कागल) सावर्डे खुर्द येथे वरिष्ठ यंत्रचालक या पदावर कार्यरत असणारे तुकारात मालवेकर यांचा मुलगा रोहित मालवेकर यांनी वयाच्या 27 व्या वर्षी युपीएससी परिक्षेत देशात 601 वी रॅंक मिळवत यश संपादन केले. त्यानिमित्ताने महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलातील ‘ऊर्जा शक्ती’ सभागृहामध्ये रोहित मालवेकर यांचा सत्कार अत्यंत उत्साहात करण्यात आला. यावेळी, ‘रोहित यांच्या यशाबद्दल महावितरण परिवारास आनंद झाला असून भविष्यात त्यांनी चांगले काम करत नावलौकिक मिळवावा’, अशा भावना मुख्य अभियंता स्वप्निल काटकर यांनी व्यक्त केल्या. तसेच महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी दूरध्वनीवरून रोहित मालवेकर यांचे अभिनंदन केले आहे.
रोहितच्या या यशाने त्यांचे कुटुंबिय, महावितरण परिवार व संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. याप्रसंगी कोल्हापूर मंडलाचे, अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, सहाय्यक महाव्यवस्थापक शशिकांत पाटील (मासं), कार्यकारी अभियंते सुनिल गवळी, दत्तात्रय भणगे, अजित अस्वले, अशोक जाधव, वरिष्ठ व्यवस्थापक आप्पासाहेब पाटील, जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले, विविध संघटनांचे प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar