
रत्नागिरी, 10 मार्च, (हिं. स.) : जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने येत्या शुक्रवारी, दिनांक १३ मार्च रोजी रत्नागिरीत प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात आला आहे.
शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी २ पर्यत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आवार, नाचणे रोड, पोस्ट एमआयडीसी येथे हा ड्राइव्ह होईल. जिल्ह्यातील खासगी आस्थापनांनी महास्वयम् वेबपोर्टलच्या माध्यमातून प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होऊन बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन प्र. सहाय्यक आयुक्त मोरेश्वर दुधाळ यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनांनी, उद्योजकांनी आपणांकडे उपलब्ध असलेली रिक्त पदे www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर अधिसूचित करण्यात यावी व जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगार संधी उपलब्ध करून द्यावी. जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनांनी/उद्योजकांनी त्यांना देण्यात आलेला युझर आयडी व पासवर्डचा वापर करून रिक्तपदे ऑनलाइन अधिसूचित करावी व प्रत्यक्ष प्लेसमेंट ड्राइव्हच्या माध्यमातून उमेदवारांची निवड करून रोजगार उपलब्ध करुन देण्यात यावा. या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास, कार्यालयाकडे त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी व रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी