
लातूर, 10 मार्च (हिं.स.)।
नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांवर पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पाठविण्यात आलेल्या पथकाने उदगीर शहर व ग्रामीण भागात मटका अड्ड्यांवर धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत रोख रकमेसह सुमारे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ९ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उदगीर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हवागीरस्वामी मठासमोर असलेल्या एका पडत्या घरात सुरू असलेल्या मटका बुकीवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत ५१ हजार ७९० रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे २० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले. या प्रकरणी ९ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६२/२०२६ नुसार महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस कर्मचारी सरकाराज गोल्लाज यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
तसेच उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एस.टी. कॉलनी परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या मटका अड्ड्यावरही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी २१ हजार ३३० रुपयांची रोख रक्कम, २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि सुमारे १५ हजार रुपये किमतीचे जी-विन लॉटरी साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणात तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११४/२०२६ नुसार महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस कर्मचारी मुबारक उल्ला करत आहेत.
या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ७३ हजार १२० रुपयांची रोख रक्कम, पाच मोबाईल व इतर साहित्य असा एकूण १ लाख २८ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis