
पुणे, 10 मार्च (हिं.स.)।
पुणे जिल्ह्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील 'फ्लायनॉट सास प्रा. लि.' (Flynaut Saas Pvt. Ltd.) या कंपनीने शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरुण पदवीधरांना नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडवल्याचे प्रकरण समोर आले होते. या गंभीर विषयावर आमदार शंकर जगताप यांनी आक्रमक भूमिका घेत विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या या पाठपुराव्याची दखल घेत आता या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
आमदार शंकर जगताप यांनी तारांकित प्रश्नाच्या (प्रश्न क्रमांक २७८६८) माध्यमातून हिंजवडी आयटी पार्कमधील 'फ्लायनॉट सास प्रा. लि. कंपनीने बेरोजगार तरुण पदवीधारकांच्या केलेल्या फसवणुकीचा मुद्दा सभागृहासमोर मांडला होता. याविषयी माहिती देताना त्यांनी की, हिंजवडी आयटी पार्क येथील 'फ्लायनॉट सास प्रा. लि. या कंपनीने ऑगस्ट २०२५ मध्ये वेगवेगळ्या कन्सल्टीच्या माध्यमातून फ्रेशर्स इंजिनीअर उमेदवारांना मोठ्या वार्षिक पगाराचे अमिष दाखवले. तसेच उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात आगऊ रक्कम स्वीकारून त्यांना कामाला लावतो, अस सांगून आणि विश्वास संपादन केला. नियुक्तीपूर्वी ट्रेनिंग आणि इतर कारणांसाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून १ लाख ते २.५० लाख रुपयांपर्यंतची रक्कम कंपनीच्या बँक खात्यावर भरून घेण्यात आली. त्यानंतर काही महिने ऑनलाइन काम करून घेतले. परंतु प्रत्यक्षात पगार दिला नाही. शेवटी पात्रता परीक्षा किंवा इंटरव्ह्यूमध्ये नापास झाल्याचे कारण देऊन अनेक विद्यार्थ्यांना कंपनीत रुजू करून घेण्यास नकार दिला.सोबतच फ्रेशर्स उमेदवारांची कोट्यावधी रुपयाची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणात हिंजवडी पोलीस स्टेशन येथे उपेश रंजीत पाटील आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची गांभीर्यता शासनाच्या निदर्शनास आणून दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु