
जळगाव, 10 मार्च (हिं.स.) भुसावळ तालुक्यातील साकेगाव परिसरात एक दुर्दैवी घटना घडली असून पाण्याच्या शोधात आलेल्या एका बलाढ्य नर निलगायीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील प्राणीमित्रांमध्ये हळहळ व्यक्त होत असून वेगवान वाहनांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. साकेगावजवळील नदीकाठी पाण्याच्या शोधात आलेल्या नर निलगायला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत निलगाय दूर फेकला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती शहरातील गोसेवक बल्लू धायडे आणि रोहित महाले यांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व वनविभागाला याबाबत कळविले. या घटनेनंतर प्राणीमित्रांनी शासनाकडे गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. गोसेवक रोहित महाले यांनी सांगितले की, सध्या प्रचंड उष्णतेमुळे वन्य प्राण्यांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने विविध ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून प्राण्यांना पाण्यासाठी रस्त्यावर किंवा मानवी वस्तीमध्ये यावे लागणार नाही. तसेच, वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अशा निष्पाप प्राण्यांचे जीव जात असल्याने प्रशासनाने वेगवान वाहनांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर