
सोलापूर, 10 मार्च (हिं.स.)
माढा येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात आज प्रियदर्शनी महिला विकास मंडळ, माढा यांच्या वतीने विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा उपक्रम प्रियदर्शनी महिला विकास मंडळाच्या अध्यक्षा तथा माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अॅड. सौ. मिनलताई साठे यांच्या संकल्पनेतून पार पडला.यावेळी विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले तसेच मासिक पाळीच्या काळात स्वच्छता आणि आरोग्याचे महत्त्व याबाबत अॅड. सौ. मिनलताई साठे यांनी मार्गदर्शन केले. मुलींनी आरोग्याबाबत जागरूक राहून स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाला मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. गीतांजलीताई देशमुख, मंडळाच्या सदस्या सौ. अरुणा देशपांडे, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सौ. संगीता पैकेकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापिका, कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.कार्यक्रमातून विद्यार्थिनींमध्ये आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड