
पुणे, 10 मार्च (हिं.स.)
पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठीच्या 10 पैकी 7 जागा सत्ताधारी भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. या 7 ही जागांवर भाजपने पराभूत उमेदवारांना संधी न देता निष्ठावंतांना संधी दिली आहे. या 7 जणांनी सोमवारी (9 मार्च) रोजी अर्ज दाखल केले. या नावांवर शिक्कमोर्तब होताच आता भाजपमधील अंतर्गत राजकारणावरही चर्चा सुरु झाली आहे.
भाजपच्या वाट्याला आलेल्या 7 जगांसाठी तब्बल 400 जण इच्छुक होते. यातून 7 जणांची निवड करण्याची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर होती. या निवडीत स्थानिक नेत्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या निकटवर्तीयांसाठी ताकद लावल्याचे पाहायला मिळाले. यात मंत्री माधुरी मिसाळ आणि आमदार हेमंत रासने यांनी बाजी मारल्याचे चित्र आहे.
7 नावांमध्ये पर्वती आणि कसबा मतदारसंघातून प्रत्येकी 2 आणि पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर आणि कोथरूड या मतदारसंघातून प्रत्येकी एका कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे. खडकवासला मतदारसंघात भाजपचाच आमदार असूनही त्या ठिकाणी कार्यकर्त्याला संधी मिळालेली नाही. शिवाय विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्याही कार्यकर्त्याला डावलल्याची चर्चा आहे.
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु