
रायगड, 11 मार्च (हिं.स.)। अलिबाग पंचायत समितीवर तब्बल ४६ वर्षांपासून असलेली शेतकरी कामगार पक्षाची सत्ता अखेर संपुष्टात आली असून शिवसेनेने दमदार विजय मिळवत सत्ता हस्तगत केली आहे. या ऐतिहासिक बदलामुळे अलिबागच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सभापतीपदी भाग्यता पाटील तर उपसभापतीपदी प्रिया भगत यांची बिनविरोध निवड झाली आहे.
अलिबाग पंचायत समितीच्या निवडणुकीत १४ पैकी तब्बल १२ जागा जिंकत शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवले. भारतीय जनता पक्षाला एक तर शेतकरी कामगार पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे सभापती आणि उपसभापती पदाची निवड बिनविरोध होणार हे आधीच स्पष्ट झाले होते.
निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात सभापती व उपसभापती निवडीची बैठक पार पडली. सभापती पदासाठी भाग्यता नंदन पाटील तर उपसभापती पदासाठी प्रिया भगत यांचा एकमेव अर्ज आल्याने दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
गेल्या चार दशकांहून अधिक काळ अलिबाग पंचायत समितीवर शेकापची एकहाती सत्ता होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी स्पष्ट कौल देत सत्तांतर घडवून आणले. त्यामुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
निवड जाहीर होताच शिवसैनिकांनी जोरदार जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी, जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर तसेच अनंत गोंधळी यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
अलिबाग पंचायत समितीतील या सत्तांतरामुळे आगामी स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)