
रत्नागिरी, 11 मार्च, (हिं. स.) : नवनिर्वाचित राजापूर पंचायत समितीची पहिली मासिक सभा येत्या २४ मार्चला होणार आहे.
सभापती नंदिनी कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपसभापती अभिजित गुरव यांच्या उपस्थितीत किसान भवन येथे त्या दिवशी सकाळी अकरा वाजता पार पडत असलेल्या मासिक सभेत तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला जाणार आहे.
राजापूर पंचायत समितीची मावळती सभा ११ मार्च २०२२ ला पार पडली होती. त्यानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर मासिक सभा पार पडत आहे. तालुक्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो हे लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी तालुक्याचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी यशस्वीरीत्या करणे ही महत्त्वाची जबाबदारी असून त्या दृष्टीने नियोजन करावे लागणार आहे. तालुका पंचायत समितीच्या मासिक सभेत त्याबाबत चर्चा होणार आहे. याव्यतिरिक्त बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, एसटी विभाग, यासह विविध विभागांचा आढावा पंचायत समितीच्या मासिक बैठकीत घेतला जाणार आहे.
नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीने विजय मिळवत सर्व 12 जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये शिवसेनेच्या 11 तर मित्रपक्ष भाजपची एक जागा यांचा समावेश आहे. दोन सभापती आणि उपसभापती यांची निवड झाली असून त्यानंतर राजापूर पंचायत समितीची पहिलीच मासिक सभा पार पडत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी