
परभणी, 12 मार्च (हिं.स.)। मध्यपूर्व आशियात सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल तसेच एलपीजी घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा केला जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
जिल्हा प्रशासनाने भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांच्या विक्री अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील गॅस व पेट्रोल वितरकांची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे वितरकांकडून सांगण्यात आले, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मुसळे यांनी दिली.
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले की, गॅस कंपन्यांकडून घरगुती एलपीजी सिलेंडरचे ऑनलाईन बुकिंग बंधनकारक करण्यात आले असून पहिला सिलेंडर घेतल्यापासून २५ दिवस पूर्ण झाल्यानंतरच दुसरा सिलेंडर बुकिंग करता येईल. त्यामुळे नागरिकांनी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरूनच बुकिंग करावे. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी पेट्रोल पंप किंवा गॅस एजन्सींवर अनावश्यक गर्दी करू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण होऊ शकणारी इंधन टंचाई व घरगुती एलपीजी गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली विशेष दक्षता पथके (फ्लाइंग स्क्वॉड) स्थापन करण्यात आली आहेत.
या पथकांकडून हॉटेल, ढाबे, व्यावसायिक आस्थापना व औद्योगिक ठिकाणी अचानक तपासणी करून घरगुती गॅस सिलेंडरचा अनधिकृत वापर आढळल्यास सिलेंडर जप्त करण्याची कारवाई केली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात अवैधरित्या वापरात असलेले ११ घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींनाही वितरणात पारदर्शकता ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यांच्या साठ्याची नियमित तपासणी केली जाणार आहे. घरगुती गॅसचा अवैध साठा किंवा व्यावसायिक वापर करताना आढळल्यास संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.घरगुती गॅसचा वापर केवळ निर्धारित कारणांसाठीच करावा. गॅसचा काळाबाजार किंवा अवैध वापर आढळल्यास तात्काळ स्थानिक तहसील कार्यालय किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच गॅसची बचत होईल अशा पद्धतीने वापर करून सौर किंवा विद्युत उपकरणांचा वापर करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis