
अकोला, 12 मार्च, (हिं.स.)।
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांव्दारे जन्म/मृत्यु दाखले मिळविण्याच्या कामामध्ये खूप विलंब आणि गैरसोय बाबत आलेल्या तक्रारींच्या अनुषगाने आज दि. 12 मार्च 2026 रोजी मनपा स्थायी समिती सभापती यांच्याव्दारे महापौर सौ.शारदा रणजीत खेडकर, मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, उपमहापौर अमोल गोगे, सभागृह नेता पवन महल्ले यांच्या विशेष उपस्थितीत मनपा जन्म/मृत्यु विभागाची आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये सर्वप्रथम स्थायी समिती सभापती यांनी जन्म/मृत्यु विभागांतर्गत चालणा-या कामाजाबाबत माहिती घेतली. तसेच ज्या नागरिकांची सीआरएस पोर्टल मध्ये असलेल्या नोंदी संदर्भात तातडीने दाखले देण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे. तसेच ज्या जन्म-मृत्युच्या नोंदी संबधीत रजिष्टर मध्ये उपलब्ध नाहीत त्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करुन लवकरात लवकर कार्यवाही करुन अर्जदारास दाखले उपलब्ध करुन देण्यासंदर्भात यापुर्वीच आदेशीत करण्यात आले होते. पंरतु त्यानुसार कार्यवाही होत नसल्याचे आजच्या सभेत निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व संबधीत कर्मचारी यांना आज सभेत विचारणा करण्यात आली असता संबधीत कर्मचारी यांनी समर्पक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे कर्मचारी यांचा निष्काळजी पणा दिसून येत आहे.
डॉ. मनिषा बोरेकर ह्या पाच ते सहा महिने पुर्वी निबंधक म्हणून महानगरपालिकेत कार्यरत होत्या. त्या आता कार्यरत नसतांनासुध्दा नागरीकांना त्यांचे नावाचे व स्वाक्षरीचे टोकन देण्यात येवून त्यांच्या नावाचा गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे तसेच प्रत्येक नागरीकाला कोणतेही कारण नसतांना दाखल्यासाठी जवळपास एक महिन्याचा वेळ देण्यात येत आहे हे चुकीचे आहे. तसेच आढावा बैठकीमध्ये खोटी माहिती देणे, कोणालाही आपल्या कामाची काळजी व जबाबदारी असल्याचे दिसून आले नाही याकरीता जन्म-मृत्यु विभागामधील कार्यरत असलेले देवानंद तायडे, श्रीमती जामनीक व शरद डोंगरे यांचेवर तातडीने प्रशासकिय कार्यवाही प्रस्तावित करुन निलंबीत करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करणे, तसेच जन्म-मृत्यु विभागामध्ये कार्यरत असलेले डॉ. फवाज खान, वैद्यकिय अधिकारी (कंत्राटी) व शेख सरफराज, लिपीक यांच्याबाबत नागरीकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच सदर कर्मचारी नागरीकांना उध्दट वागणूक देत असल्याबाबत नगरसेवकांच्या तक्रारी सुध्दा प्राप्त होत आहे. त्याबाबत त्यांची प्रशासनामार्फत चौकशी करुन त्यांची बदली डम्पींग ग्राऊडवर किंवा कोंडवाडा विभागामध्ये करण्यात यावी असे निर्देश स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी प्रशासनाला दिले.
यावेळी नगरसेवक सिध्दार्थ उपरवट, संदीप शेगोकार, मनपा उपायुक्त विजय पारतवार, सामाजिक कार्यकर्ते रणजीत खेडकर, अफसर कुरेशी, संदीप गावंडे, किशोर वरोकार, मोहम्मद इलियास, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.रुची पहूरकर यांचेसह जन्म/मृत्यु विभागतील कर्मचा-यांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे