
लातूर, 12 मार्च (हिं.स.)।
केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात केलेल्या भरमसाठ वाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी आज लातूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरात अत्यंत आक्रमक आणि अनोखे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस भवन ते महात्मा गांधी चौक या मार्गावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गॅस सिलेंडरची चक्क 'अंत्ययात्रा' काढून महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर केंद्र सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध नोंदवला.
सिलेंडरची तिरडी आणि सरकारचा निषेध.
या आंदोलनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कार्यकर्त्यांनी गॅस सिलेंडरला फुलांचे हार घालून, त्याला बांबूच्या तिरडीवर बांधून त्याची अंत्ययात्रा काढली. महागाईने सामान्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली असून, गॅस सिलेंडर आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे, अशा भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या. 'भाजप सरकारचे करायचे काय, खाली डोकं वर पाय' परत या परत या गॅस दर परत , अमर रहे अमर रहे गॅस सिलेंडर अमर रहे, या अशा घोषणांनी लातूरचा मुख्य बाजारपेठ परिसर दणाणून गेला होता.
रस्त्यावर पेटली चूल.
आंदोलनादरम्यान केवळ घोषणाबाजी न करता, महिला कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात लाकडाची चूल पेटवून त्यावर स्वयंपाक करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. वाढत्या महागाईमुळे गॅस वापरणे अशक्य झाल्याने आता पुन्हा चुलीकडे वळण्याची वेळ आली आहे, हे यातून अधोरेखित करण्यात आले. एकदा गॅस देऊन फोटो काढणारे सरकार आता तोच गॅस भरण्यासाठी हजारो रुपये उकळत आहे, असा घणाघात यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी केला.
जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांचा आक्रमक पवित्रा आणि पुढील इशारा.
या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, देशातील प्रत्येक नागरिक आज महागाईने होरपळून निघाला आहे. २१ व्या शतकात जर लोकांना गॅससाठी रांगा लावाव्या लागत असतील, तर हे सरकारचे अपयश आहे. युपीए सरकारच्या काळात ४०० रुपयांना मिळणारा सिलेंडर आज १२८० रुपयांच्या पुढे गेला आहे. सरकारने ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.
ॲड.किरण जाधव यांचा सरकारवर घणाघात.
लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.किरण जाधव यांनी सरकारवर सडकून टीका केली. जाधव म्हणाले की, “लाडकी बहीण' म्हणून योजना आणायची आणि दुसऱ्या बाजूला गॅसचे दर वाढवून त्यांच्या खिशातून पैसे काढून घ्यायचे, हे सरकारचे दुटप्पी धोरण आहे. काँग्रेसच्या काळात ४५० रुपयांना मिळणारा गॅस आज १२८० रुपयांवर गेला आहे. आज गॅस बुक केला तरी तो मिळेल की नाही, याची शाश्वती राहिलेली नाही. गॅसच्या या टंचाईमुळे आणि महागाईमुळे सर्वसामान्य जनता भयभीत झाली आहे. या महागाईने रोजगारची समस्या निर्माण झाली आहे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना पकोडे विक्रीचा उपदेश देणाऱ्या सरकारने आता त्यांना गटारीतून गॅस निर्मितीचे प्रशिक्षण द्यावे अशी मागणी केली .
हॉटेलमधील जेवणही महागले
जाधव यांनी पुढे नमूद केले की, गॅस दरवाढीचा फटका केवळ घरगुती बजेटलाच नाही, तर हॉटेल व्यवसायालाही बसला आहे. कमर्शियल गॅसच्या वाढत्या दरामुळे हॉटेलमधील जेवण महाग झाले असून, त्याचा अंतिम बोजा सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावरच पडत आहे. या महागाईच्या चक्रव्यूहात जनता अडकली असताना सरकार मात्र केवळ घोषणाबाजी करण्यात मग्न आहे.
यावेळी उपमहापौर ॲड स्नेहल उटगे, महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते विजयकुमार साबदे, सपना किसवे,तबस्सुम शेख, सचिन बंडापल्ले, फारुख शेख, अभिषेक पतंगे, मंगेश सोनकांबळे, पवन सोलंकर यांच्यासह अनेक नगरसेवक महिला आघाडीच्या पदाधिकारी, विविध फ्रंटल सेलचे अध्यक्ष व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आजच्या या आंदोलनामुळे महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांनी देखील या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवल्याचे पाहायला मिळाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis