नांदेड - १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी मोफत एचपीव्ही लसीकरण मोहीम
नांदेड, 12 मार्च, (हिं.स.)। गर्भाशय मुखाचा कर्करोग (सव्हिंकल कॅन्सर) रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या एचपीव्ही (एचपीव्ही) लसीकरण मोहिमेबाबत महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयात टास्कफोर्स समितीची बैठक पा
नांदेड - १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी मोफत एचपीव्ही लसीकरण मोहीम


नांदेड, 12 मार्च, (हिं.स.)। गर्भाशय मुखाचा कर्करोग (सव्हिंकल कॅन्सर) रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या एचपीव्ही (एचपीव्ही) लसीकरण मोहिमेबाबत महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयात टास्कफोर्स समितीची बैठक पार पडली. या मोहिमेअंतर्गत शहरातील किशोरवयीन मुलींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बैठकीत महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरी आरोग्य केंद्रे व शाळांमध्ये या लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच सर्व लाभार्थी मुलींची नोंदणी केंद्र सरकारच्या 'यू-विन' पोर्टलवर डिजिटल पद्धतीने करण्याचेही सांगण्यात आले.

भारतातील महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा दुसरा क्रमांक लागतो. हा आजार टाळण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रतिबंधात्मक एचपीव्ही लस देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या मोहिमेत 'गार्डासिल-४' ही लस वापरण्यात येणार असून १४ वर्षे पूर्ण केलेल्या, परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना ही लस मोफत दिली जाणार आहे. योग्य वयात (९ ते १४/१५ वर्षे) ही लस घेतल्यास गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.

या लसीकरणासाठी पालकांची संमती आवश्यक असून लसीकरणानंतर लाभार्थ्यांच्या डाव्या हाताच्या करंगळीवर शाईने खूण केली जाणार आहे. बैठकीस अतिरिक्त आयुक्त निलेश सुनकेवार, उपआयुक्त अजितपालसिंघ संधू, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत रिड्डे, उपवैद्यकीय आरोग्य अधिकारी व लसीकरण अधिकारी डॉ. बालाप्रसाद कुंटुरकर, डॉ. सुप्रिया अ पंडित, डॉ. मो. बदीयोद्यीन, डॉ. कल्याण पवार, वि डॉ. काझीम, शहर कार्यक्रम व्यवस्थापक सुहास सोनुले, बालाजी चव्हाण, आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रल्हाद कोटकर, फॉक्सीच्या डॉ. मिनल पाटील, लायन्स क्लबचे अध्यक्ष विश्वजीत राठोड, सचिव प्रविण अग्रवाल तसेच महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शहरातील १४ वर्षे पूर्ण केलेल्या मुलींनी या मोफत लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande