सोलापूर - प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22 वा हप्ता 13 मार्च रोजी वितरीत होणार
सोलापूर, 12 मार्च, (हिं.स.) - केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीतील 22 वा हप्ता मा. प्रधानमंत्री यांच्या शुभहस्ते दिनांक 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5.00 वाजता ज्योती-ब
PM Kisan


सोलापूर, 12 मार्च, (हिं.स.) - केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीतील 22 वा हप्ता मा. प्रधानमंत्री यांच्या शुभहस्ते दिनांक 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5.00 वाजता ज्योती-बिष्णु आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र, खानापारा, गुवाहाटी (आसाम) येथे वितरित करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाचा आधार मिळावा यासाठी ही योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरू केली आहे. योजनेनुसार पात्र शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्षी रु. 6,000 इतकी आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये (प्रति हप्ता रु. 2,000) त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केली जाते. आतापर्यंत राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना 21 हप्त्यांद्वारे सुमारे रु. 39,300 कोटींचा लाभ वितरित झाला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे, बँक खाते आधारशी संलग्न करणे तसेच ई-केवायसी प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे.

सद्यस्थितीत या तिन्ही बाबींची पूर्तता केलेल्या सुमारे 91.19 लाख शेतकरी कुटुंबांना दिनांक 13 मार्च रोजी सुमारे रु. 1,837 कोटी इतकी रक्कम थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन राज्यातील कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, शासकीय कार्यालये, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपनी (FPCs), शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) आणि सहकारी पतसंस्था (PACS) येथे करण्यात येणार आहे. नागरी सुविधा केंद्रांवरूनही या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

राज्यातील कृषी विभाग, महसूल व वने विभाग तसेच ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा समारोह साजरा होणार असून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण https://pmindiawebcast.nic.in या संकेतस्थळावरून करण्यात येईल. राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे येथील कृषी आयुक्तालयाचे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) रफिक नाईकवाडी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande