इराण-अमेरिका-इस्त्रायल संघर्ष: युद्ध थांबवण्यासाठी इराणच्या तीन अटी
तेहरान, 12 मार्च (हिं.स.)।मध्य पूर्वेत इराण आणि अमेरिका-इस्त्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज तेरावा दिवस आहे. ही लढाई प्रत्येक दिवसागणिक अधिक तीव्र होत चालली आहे. आजही दोन्ही बाजूंनी जोरदार क्षेपणास्त्र, बॉम्ब आणि तोफगोळ्यांचा मारा सुरू आहे
इराण-अमेरिका-इस्त्रायल संघर्ष: युद्ध थांबवण्यासाठी इराणच्या तीन अटी


तेहरान, 12 मार्च (हिं.स.)।मध्य पूर्वेत इराण आणि अमेरिका-इस्त्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज तेरावा दिवस आहे. ही लढाई प्रत्येक दिवसागणिक अधिक तीव्र होत चालली आहे. आजही दोन्ही बाजूंनी जोरदार क्षेपणास्त्र, बॉम्ब आणि तोफगोळ्यांचा मारा सुरू आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील युद्ध लवकरच संपण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे की इराणमध्ये आता काहीही उरलेले नाही आणि अमेरिकेने आपली सर्व लष्करी उद्दिष्टे पूर्ण केली आहेत. दुसरीकडे, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी युद्ध समाप्त करण्यासाठी तीन महत्त्वाच्या अटी मांडल्या आहेत.

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील त्यांच्या अधिकृत हँडलवर पोस्ट करत म्हटले —“रशिया आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी संवाद साधताना मी प्रदेशात शांततेसाठी इराणची बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून सुरू करण्यात आलेले हे युद्ध संपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे — इराणच्या वैध अधिकारांना मान्यता देणे, नुकसानभरपाईचा भरणा करणे आणि भविष्यातील आक्रमणांविरोधात ठोस आंतरराष्ट्रीय हमी देणे.”

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एक मोठा दावा केला आहे. ट्रम्प यांनी म्हटले की इराणमधील लष्करी तळ आणि लक्ष्यांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्यात आले असून त्यामुळे आता इराणमध्ये काहीही शिल्लक राहिलेले नाही. त्यांच्या वायुसेनेपासून ते हवाई संरक्षण व्यवस्थेपर्यंत सर्व काही निष्प्रभ करण्यात आले आहे आणि अमेरिका जेव्हा इच्छितील तेव्हा हे युद्ध संपवू शकते. मात्र, युद्ध समाप्त करण्यासाठी अमेरिका नेमकी कोणती रणनीती अवलंबणार आहे, याबाबत त्यांनी स्पष्ट माहिती दिली नाही. तसेच त्यांनी असा आरोप केला की इराणने गेल्या ४७ वर्षांत जगाला मोठे नुकसान पोहोचवले असून आता त्याची किंमत चुकवावी लागत आहे.

दरम्यान, इस्त्रायलचे हिजबुल्लाहच्या ठिकाणांवरील हल्ले सुरूच आहेत. इस्त्रायलने लेबनानची राजधानी बेरूत येथे जोरदार हवाई हल्ले केले आहेत. इस्त्रायली संरक्षण दलाच्या (आयडीएफ) हवाई कारवाईत बेरूतच्या दक्षिणेकडील बुर्ज अल-बराजनेह परिसराचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यानंतर बेरूतमधील निवासी भागांत जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि अनेक घरांना आग लागली.लेबनानच्या आरोग्य मंत्रालयानुसार, २ मार्चपासून सुरू असलेल्या इस्त्रायली हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ८६ मुलांसह आणि ४७ महिलांसह ६०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून १,४४४ जण जखमी झाले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande