
कोल्हापूर, 12 मार्च, (हिं.स.)। राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (NTCP) अंतर्गत FCTC च्या कलम 5.3 (तंबाखूमुक्त संस्था) या विषयावर असंसर्गजन्य रोग कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकारी, दंत शल्यचिकित्सक आणि स्टाफ नर्स यांच्यासाठी क्षमता बांधणी कार्यशाळा उत्साहात पार पडली.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांच्या हस्ते झाले. उद्घाटनपर भाषणात त्यांनी तंबाखू नियंत्रणासाठी प्रभावी अंमलबजावणी आणि विविध विभागांमधील समन्वयाची आवश्यकता अधोरेखित केली.
कार्यशाळेत जिल्हा सल्लागार (NTCP) डॉ. व्ही. ए. आरळेकर यांनी एनटीसीपी कार्यक्रमाची रचना, उद्दिष्टे आणि कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच FCTC च्या कलम 5.3 अंतर्गत तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून सार्वजनिक आरोग्य धोरणांचे संरक्षण करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
दंत शल्यचिकित्सक डॉ. अर्चना पाटील यांनी तोंडाचा कर्करोग, त्याची लक्षणे तसेच मौखिक आरोग्याशी संबंधित आपत्कालीन परिस्थितीबाबत मार्गदर्शन केले. तर डॉ. भूमिका फतेवाड यांनी मौखिक आरोग्य तपासणीची पद्धत आणि सामान्य तोंडी आजारांविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.
सामाजिक कार्यकर्त्या क्रांती शिंदे यांनी कोटपा अधिनियम 2003 अंतर्गत असलेल्या तरतुदी आणि त्याची अंमलबजावणी याबाबत माहिती दिली. तसेच मानसशास्त्रज्ञ चारुशीला कणसे यांनी FGD (फोकस ग्रुप डिस्कशन) संदर्भात मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाला वैद्यकीय अधिकारी, दंत शल्यचिकित्सक आणि स्टाफ नर्स यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तंबाखूमुक्त संस्था व परिसर निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यावेळी ट्रेनिंग सेंटरचे डॉ. सुनील कुरुंदवाडे, प्रमोद ढाले आणि राजश्री साबळे उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar