
कोलकाता, 12 मार्च (हिं.स.)।पश्चिम बंगालचे नवे राज्यपाल आर. एन. रवी यांनी गुरुवारी कोलकाता येथील लोकभवनात राज्याचे २२वे राज्यपाल म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यांना न्यायमूर्ती संजय पॉल यांनी शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते आणि अधिकारी उपस्थित होते.
पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर केंद्र सरकारने आर. एन. रवी यांची राज्याच्या नव्या राज्यपालपदी नियुक्ती केली. यापूर्वी ते तमिळनाडूचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते.
तमिळनाडूमधील त्यांच्या कार्यकाळात राज्य सरकार, विशेषतः मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सरकारसोबत विविध मुद्द्यांवर त्यांचे मतभेद चर्चेत राहिले होते. अनेक विधेयकांवरून राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील वाद सार्वजनिकरित्या समोर आले होते. इतकेच नव्हे तर राज्य सरकारने राष्ट्रपतींकडे राज्यपालांना पदावरून हटवण्याची मागणीही केली होती.
दरम्यान, सी. व्ही. आनंद बोस यांच्या अचानक राजीनाम्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना या राजीनाम्याच्या बातमीने आपण स्तब्ध आणि चिंतित झाल्याचे म्हटले होते. तसेच आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी कोणत्याही राजकीय दबावाखाली हा निर्णय घेतला गेला असल्यास ते चिंताजनक ठरेल, अशी शंका त्यांनी व्यक्त केली होती. आता आर. एन. रवी यांनी राज्यपालपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यातील पुढील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode