खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभ
रायगड, 12 मार्च (हिं.स.)। राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने मिळावा यासाठी राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत ‘क्रीडा ई-प्रमाण’ ही अत्याधुनिक प्रणाली सुरू क
खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवांमध्ये ५  आरक्षणाचा लाभ


रायगड, 12 मार्च (हिं.स.)। राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने मिळावा यासाठी राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत ‘क्रीडा ई-प्रमाण’ ही अत्याधुनिक प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीचा लाभ घेण्यासाठी खेळाडूंनी क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला https://sports.maharashtra.gov.in/ भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रणालीअंतर्गत खेळाडूंनी आपल्या मूळ क्रीडा प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर विभागीय स्तरावर त्या माहितीची पडताळणी करून संबंधित अभिलेख पोर्टलवर अद्ययावत केले जातील. अधिक माहितीसाठी आणि मार्गदर्शक सूचनांसाठी खेळाडूंनी या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही प्रणाली ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असल्यामुळे यात कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप किंवा फेरफार होण्याची शक्यता नाही. त्यामुळे बोगस प्रमाणपत्रांना आळा बसण्यास मदत होणार आहे. खेळाडूंनी माहिती भरल्यानंतर ती मूळ नोंदींशी जुळल्यास अवघ्या २४ तासांत डिजिटल पडताळणी अहवाल उपलब्ध होतो. तसेच प्रत्येक प्रमाणपत्रावर अद्वितीय क्यूआर कोड देण्यात येणार असून तो स्कॅन करून नियुक्ती प्राधिकरण संबंधित प्रमाणपत्राची सत्यता त्वरित तपासू शकतील.

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) तसेच इतर सर्व शासकीय पदभरतीसाठी अर्ज करताना खेळाडूंना आता ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. या प्रमाणपत्राशिवाय खेळाडू संवर्गातून अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद सर्व खेळाडूंनी घ्यावी.

या प्रणालीअंतर्गत ५ टक्के खेळाडू आरक्षणासाठी आवश्यक असलेले अभिलेख ‘क्रीडा ई-प्रमाण’ पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहेत. या अभिलेखांच्या आधारे खेळाडूंना आपले डिजिटल प्रमाणपत्र घरबसल्या मिळू शकणार आहे. यासाठी खेळाडूंनी पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य असून नोंदणी करताना आधार संलग्न मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, आधार कार्डाची पीडीएफ प्रत तसेच क्रीडा स्पर्धेतील प्रावीण्य प्रमाणपत्राची प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.

सध्या कबड्डी, फेन्सिंग, ट्रायथलॉन (२०२५), ज्युडो (२०२४) आणि कुराश (२०२४-२५ व २०१७-१८) या स्पर्धांचे अभिलेख ऑनलाईन उपलब्ध झाले असून संबंधित खेळाडूंनी तात्काळ अर्ज करावेत. इतर खेळांचे अभिलेखही टप्प्याटप्प्याने प्रणालीवर उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande