
लातूर, 12 मार्च (हिं.स.)।
विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, लातूर यांच्या वतीने काढण्यात आलेला विद्यार्थी आक्रोश मोर्चा उत्साहात पार पडला. शेकडो विद्यार्थी कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे शहरातील वातावरण घोषणांनी दणाणून गेले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय व सुरक्षेसंबंधी प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मोर्चादरम्यान आयटीआयमधील विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल विषयांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा अनेक ठिकाणी उपलब्ध नसल्या येथेची गंभीर बाब मांडण्यात
आली. प्रयोगशाळा व आवश्यक साधनसामग्रीच्या अभावामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचे वक्क्यांनी नमूद केले. तसेच आयटीआय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या भत्त्यात होणारी अनियमितता थांबवून तो वेळेवर मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची अनेक वर्षांपासूनची जिल्हा रुग्णालयासंदर्भातील मागणी अद्याप पूर्ण झालेली नसल्याबाबतही परिषदेकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पुरेशा वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात आले.
मोफत शिक्षणाच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांकडून शिक्षण व ट्युशनची फी आकारली जात असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. तसेच एमपीएससी व यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांच्या वेळापत्रकात वारंवार होणारे बदल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणींबाबतही विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. याशिवाय अनेक महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मुद्दाही मोर्चात उपस्थित करण्यात आला. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्राध्यापकच उपलब्ध नसल्याची परिस्थिती असल्याचे
सांगण्यात आले.
शहरातील शैक्षणिक परिसरात वाढत असलेल्या गुन्हेगारी व अमली पदार्थांच्या वाढत्या प्रमाणाबाबतही चिंता व्यक्त करत पोलिस प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाने तात्काळ ठोस निर्णय घ्यावेत, अन्यथा मुंबई मंत्रालयावर विद्यार्थी परिषदेकडून मोर्चा धडकविण्यात येईल, असा इशारा प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नावरे यांनी दिला. या वेळी यश आरिकर, विशाल परिहार, ऋतुजा अट्टल, लक्ष्मी गोडबोले, गौरव पाटील, निकिता बिरादार आदी उपस्थित होते. मोर्चा प्रमुख म्हणून प्रतीक बारबोले यांनी काम पाहिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis