
नाशिक, 12 मार्च (हिं.स.)।
आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक झाले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे ताणतणाव, मानसिक अस्वस्थता, लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब अशा अनेक समस्या वाढताना दिसतात. अशा परिस्थितीत योग ही आपल्या भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. आपण सर्वांनी ती जपली पाहिजे असे प्रतिपादन डॉ.शेफाली भुजबळ यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येवला शहर महिला आघाडीच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधत महिलांसाठी मर्चंड बँक हॉल येथे मोफत साप्ताहिक योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन आज डॉ.शेफाली भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी उपनगराध्यक्षा पुष्पा गायकवाड, नगरसेविका पारूल गुजराथी, महिला शहराध्यक्षा राजश्री पहिलवान, डॉ. दिपाली क्षत्रिय, युवती अध्यक्ष सीमा गायकवाड, योग प्रशिक्षक ज्योती कोकणे,
यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
यावेळी डॉ.शेफाली भुजबळ म्हणाल्या की, योग हा फक्त व्यायाम नाही, तर तो शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी जीवनपद्धती आहे. नियमित योगाभ्यास केल्याने शरीर निरोगी राहते, मन शांत होते आणि आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपले प्राचीन ऋषी-मुनी हजारो वर्षांपूर्वीपासून योग साधना करत होते. आज संपूर्ण जग योगाचे महत्त्व ओळखत आहे. निरोगी समाज घडवण्यासाठी महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. घरातील आई निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंब निरोगी राहते. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या की, राष्ट्रावादी महिला काँग्रेस, येवला शहर यांनी घेतलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. या शिबिरामुळे येवला शहरातील महिलांना आणि नागरिकांना नियमित योगाभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. अशा उपक्रमांमुळे समाजामध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढेल आणि निरोगी जीवनशैली स्वीकारण्याची प्रेरणा मिळेल.
म्हणूनच या शिबिराचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा व नियमित योगाभ्यास करावा आणि आपल्या कुटुंबियांनाही या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV