२०२६–२७ पासून मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढेल - दादाजी भुसे
मुंबई, 12 मार्च (हिं.स.) : राज्यातील शाळांमध्ये भौतिक सुविधा वाढवणे, शिक्षक भरती पारदर्शक पद्धतीने करणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देणे यावर राज्य शासन भर देत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली. मराठी माध्यम
२०२६–२७ पासून मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढेल - दादाजी भुसे


मुंबई, 12 मार्च (हिं.स.) : राज्यातील शाळांमध्ये भौतिक सुविधा वाढवणे, शिक्षक भरती पारदर्शक पद्धतीने करणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देणे यावर राज्य शासन भर देत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली. मराठी माध्यमाच्या शाळांतील पटसंख्या कमी होत असल्याची चिंता व्यक्त होत असली तरी सरकारच्या प्रयत्नांमुळे 2026–२७ पासून मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढताना दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्याच्या अर्थसंकल्पातील शालेय शिक्षण विभागाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, राज्यात सध्या १,०८,०६५ शाळा कार्यरत आहेत. त्यामध्ये ६४,४७७ शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, २४,३८० खासगी अनुदानित शाळा आणि १९,२०८ स्वयंअर्थसहाय्यित शाळा आहेत. शाळांमधील सुविधा तपासण्यासाठी यू-डायस प्रणालीद्वारे माहिती गोळा केली जाते. शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, सुरक्षित इमारत, ई-सुविधा, क्रीडांगण, ग्रंथालय आणि प्रयोगशाळा अशा आवश्यक सुविधा राज्य व केंद्र शासन, जिल्हा नियोजन समिती, सीएसआर निधी, स्थानिक विकास निधी तसेच विविध विभागांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

शिक्षक भरतीबाबत शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले की, टीईटी परीक्षा आणि ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक भरती प्रक्रिया राबविली जात आहे. २०१७ मध्ये ९,२१४ शिक्षकांची भरती करण्यात आली होती, तर २०२२ मध्ये २३ हजारांहून अधिक शिक्षक पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त झाले. सध्या संचमान्यतेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्यानुसार नवीन शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये कला आणि क्रीडा विषयांचे शिक्षकही नियुक्त केले जाणार आहेत. पेसा क्षेत्रातील भरतीबाबत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निकषांनुसार पुढील प्रक्रिया केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. निवृत्त शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केले जात असले तरी संचमान्यता झाल्यानंतर नियमित शिक्षक उपलब्ध करून दिले जातील, असे त्यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील गरदरेवाडी येथे ग्रामस्थांच्या लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेचा एका महिन्यात कायापालट करण्यात आला आहे. या उपक्रमातून प्रेरणा घेऊन आसपासच्या 100 गावांनीही आपल्या शाळा सुधारण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती भुसे यांनी यावेळी दिली.

विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन आणि गणित कौशल्य तपासण्यासाठी शाळांना नियमित भेटी व व्हिडिओ कॉलद्वारे आढावा घेण्याची योजना राबविण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आरोग्य पत्रिका तयार करण्याचेही नियोजन आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande