
नवी दिल्ली, 13 मार्च (हिं.स.) : लोकसभेत विरोधी बाकांवरील 8 निलंबित खासदारांच्या मुद्यावरून आज, शुक्रवारी विरोधी पक्षांनी जोरदार गोंधळ घातला. प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी 8 निलंबित खासदारांना पुन्हा सभागृहात प्रवेश देण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षाच्या खासदारांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले.
सभागृहात सुरू झालेल्या गोंधळामुळे कामकाज सुरळीत चालू शकले नाही. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासदारांना शांततेचे आवाहन करत संसदेची प्रतिष्ठा राखण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जर तुम्ही सभागृहात टेबलांवर चढलात, तर अशा वर्तनावर कारवाई होणारच. संसदेची प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी प्रत्येक सदस्याची आहे. परंतु, त्यानंतही दगारोळ सुरूच होता. विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभा प्रथम दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू करण्याचा प्रयत्न झाला, मात्र पुन्हा गोंधळ सुरू झाल्याने लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर दुपारी 2 वाजता कामकाज सुरू झाले असले तरी ते केवळ एक तासच चालू राहिले. सततच्या घोषणाबाजी आणि गोंधळामुळे अखेर लोकसभेचे कामकाज 16 मार्चपर्यंत तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला. संसदेतील या गोंधळामुळे महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा आणि इतर कामकाजावरही परिणाम झाल्याचे दिसून आले. यावेळी विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी केली. एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या किमती आणि इंधन संकटाचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या परिसरात फलक आणि बॅनर दाखवत निषेध नोंदवला.
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे देशासमोर काही आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहे. अशा संवेदनशील परिस्थितीत विरोधकांनी सरकारच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या ते बेजबाबदारपणे वागत असल्याचे सीतारामन म्हणाल्या.--------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी