
प्रत्येकी दहा सिलेंडरसाठी प्रशासनाला पत्र
नाशिक, 14 मार्च (हिं.स.)। अमेरिका- इस्रायल आणि इराण युद्धाची झळ देशालाही बसू लागली आहे. गॅस टंचाईच्या अफवांमुळे सर्वसामान्यांसह शालेय पोषण आहार, आदिवासी आश्रमशाळांमधून दिल्या जाणार्या भोजनावर याचा परिणाम झाल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील जवळपास सर्वच शासकीय आश्रमशाळांमध्ये भोजनाचा ठेका दिलेला आहे. हा सर्व स्वयंपाक गॅसवर शिजविला जातो. त्यामुळे तुटवडा जाणवण्यास सुरवात झाली आहे. ठेकेदारांकडून किचन चालविले जात असून, जास्त पैसे देऊन सिलेंडर आणून जेवण बनविण्याची वेळ आली आहे.
आदिवासी विकास विभागाकडून संबंधित विद्यार्थ्यांचा विचार करता पुरवठा अधिकारी, नाशिक यांना लागणार्या गरजेनुसार गॅस सिलेंडरची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, आदिवासी आश्रमशाळांमध्ये कोणत्याही प्रकारची गैरसोय नाही. मुबलक गॅसचा साठा उपलब्ध आहे. सेंट्रल किचनमधून विद्यार्थ्यांना जेवण पुरविले जात आहे.कोेणत्याही प्रकारची गैरसोय नसल्याचा दावा केला जात आहे.
आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. मुंढेगाव येथील सेेंट्रल किचनच्या माध्यमातून नाशिक विभागातील सिन्नर, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर येथील आश्रमशाळांना आहार पुरविला जातो. आतापर्यत कंत्राटदाराने अधिकच्या रकमेतून सिलेंडर आणून आहार पुरविला होता; परंतु आता गॅस टंचाईच्या अफवेने काळ्या बाजारात अव्वाच्या सव्वा दराने सिलिंडरची विक्री होत असल्याने ठेकेदारांनी तालुकास्तरावर प्रत्येक आश्रमशाळेला दहा सिलिंडरची मागणी पत्राद्वारे केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
राज्यात एकूण 497 शासकीय आश्रमशाळा आणि 554 अनुदानित अशा एकूण 1051 आश्रमशाळा कार्यरत आहेत. या शाळांमध्ये निवासी विद्यार्थ्यांना सर्व सुविधा पुरविल्या जातात. बहिःस्थ विद्यार्थ्यांना केवळ पोषण आहार दिला जातो.
आदिवासी विकास विभागातील 497 अनुदानित आश्रमशाळांमध्ये सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून जेवण पुरविले जाते. मुंढेगाव येथील सेेंट्रल विभागाद्वारे नाशिक विभागातील 45 आदिवासी आश्रमशाळांमधील 14 हजार विद्यार्थ्यांना सकाळचा नाश्ता, दुपार व संध्याकाळचे जेवण पुरविले जाते.
प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत येणार्या वसतिगृहांमध्ये त्यांना लागणा-या सिलिंडरची मागणी करणारे पत्र पुरवठा अधिका-याना देण्यात येणार आहे. तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी यांना प्रत्येक आश्रमशाळेसाठी दहा व्यावसायिक गॅस सिलिंडरची मागणी करण्यात आली आहे. गॅस टंचाईमुळे लाकडाची शोधाशोध, इलेक्ट्रिक शेगडीचा शोध घेतला जात आहे. इलेक्ट्रिक शेगडीचे दर 1200 वरून पाच हजारांवर गेल्यानेही ठेकेदारांनी चिंता व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV