
नाशिक, 14 मार्च, (हिं.स.)। सीलबंद केलेल्या फ्लॅटचे लॉक तोडून बळजबरीने ताबा घेऊन कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रमोद प्रभाकर कदम (रा. अम्मूनगर, कल्याण पश्चिम, जि. ठाणे) हे इक्विटस स्मॉल फायनान्सचे काम पाहतात. कदम
यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की इक्विटस स्मॉल फायनान्सने कर्जदार दीपक रोहिदास पाठक (वय ४५) व योगेश रोहिदास पाठक (वय ४४, दोघेही रा. साईमंगल अपार्टमेंट, एकदंतनगर, अंबड, पवननगर, सिडको) यांना कर्ज दिले होते. त्या कर्जाचे हप्ते थकल्याने कोर्ट कमिशनर यांच्या न्यायालयाने निकाल दिल्याने हा फ्लॅट कोर्ट कमिशनर व पंचांसमक्ष सीलबंद करून ताब्यात घेतला होता; मात्र दीपक व योगेश पाठक यांनी दि. ११ मार्च रोजी सकाळी
११ वाजेच्या सुमारास सीलबंद केलेल्या फ्लॅटचे लॉक तोडून त्याचा ताबा बळजबरीने घेतला आहे. या कृत्यामुळे बँकेच्या कायदेशीर मार्गाने ताब्यात घेतलेल्या मिळकतीचा अडथळा निर्माण करून मालमत्तेचे नुकसान करून कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केले, तसेच फ्लॅटला सीलबंद केलेले लॉक तोडून ७५० रुपयांचे नुकसान केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार बनतोडे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV