
जळगाव, 14 मार्च (हिं.स.) शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यात आज राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याची घटना घडली. शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट पोलीस ठाण्यातच हाणामारी झाल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टच्या वादातून या दोन गटांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दुपारी शहरातील बालाजी पेठ परिसरात दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली होती.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी दोन्ही गट शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले. भाजपचे नगरसेवक कल्पेश सोनवणे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे आणि राहुल ठाकरे हे परस्परविरोधी तक्रार देण्यासाठी आले असताना पोलीस ठाण्यातच पुन्हा दोन्ही गटांमध्ये वाद वाढला.क्षणातच हा वाद हाणामारीत बदलला आणि पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत माजी नगरसेवक कैलास सोनवणे जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. जमाव आक्रमक होत असल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून जमाव पांगवला. पोलीस ठाण्यातच हाणामारी झाल्यामुळे शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर