
नाशिक, 15 मार्च (हिं.स.)।, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक यांच्यामार्फत जिल्ह्यात 14 मार्च, 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यातून एकूण 16 हजार 826 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून सर्व प्रकरणांमध्ये तडजोडीअंती सुमारे 86 कोटी 94 लाख 89 हजार 133 रूपये तडजोड शुक्ल म्हणून वसूल करण्यात आले आहे. अशी माहिती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सुहास भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
14 मार्च 2026 रोजीच्या राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण 55 पॅनलवर प्रलंबित 32 हजार 975 तर दाखल पुर्व 80 हजार 267 इतकी प्रकरणे ठेवण्यात आली होती यापैकी 4 हजार 159 प्रलंबित प्रकरणे तर 12 हजार 667 इतकी दाखल पूर्व प्रकरणे एकाच दिवशी लोक अदालतीच्या माध्यामातून निकाली निघाली.
मोटार अपघात प्रकरणांमध्ये 15 जुलै 2022 रोजी मयत पोलीस कॉन्स्टेबल मधुकर लक्ष्मण खुळे हे मोटार सायकलने सिन्नर कडून पांढुर्ली चौफुलीकडे येत असतांना पिकअप जीपने दिलेल्या धडकीत ते मार लागून मयत झले. या प्रकरणात पक्षकारांच्या परस्पर सहमतीने रूपये 46 लाख 50 हजार रकमेत तडजोड होवून प्रकरण लोक अदालतीत निकाली काढण्यात आले निफाड येथे अपघातात मयत झालेले योगेश सुखदेव शिंदे हे राजस्थानमधील जोधपूर येथे सैन्य दलात कार्यरत होते. वारसांनी प्राधिकरणाकडे नुकसान भरपाईसाठी केलेल्या दाव्यात समेट होवून लष्करी जवानाच्या कुटुंबियांना रूपये 1 कोटी 20 लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय होवून प्रकरण निकाली काढण्यात आले.
तर लोक अदालतीत कौटुंबिक वाद प्रकरणांमध्ये एकूण 3 हजार 173 प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी 40 प्रकरणांमध्ये आपसी समझोत्याने वाद मिटून दाम्पत्यांचे वैवाहिक जीवन पूर्ववत झाले.
चौकट
▪️परक्राम्य संलेख अधिनियम, कलम 138 अंतर्गतची प्रकरणे – 1141 प्रकरणे▪️मोटार अपघात प्रकरणे- 273 प्रकरणे▪️कामगार विषयक- 6 प्रकरणे▪️कौटुंबिक वादातील प्रकरणे- 40 प्रकरणे▪️फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे- 225 प्रकरणे▪️इतर – 15141 प्रकरणे
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV