
लातूर, 15 मार्च, (हिं.स.)। लातूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती २०२४–२०२५ अंतर्गत घेण्यात आलेली लेखी परीक्षा रविवारी पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव येथे शांततेत व सुरळीत पार पडली. या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या ३२८ उमेदवारांपैकी ३१९ उमेदवार उपस्थित राहिले, तर ९ उमेदवार अनुपस्थित राहिल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.
लातूर जिल्हा पोलीस दलात एकूण ३० पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून त्याअंतर्गत ही लेखी परीक्षा घेण्यात आली. भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारांची शारीरिक मोजमाप व शारीरिक मैदानी चाचणी ११ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत पोलीस मुख्यालय, बाभळगाव येथे घेण्यात आली होती. या चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेली गुणवत्ता यादी २७ फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती.
या गुणवत्ता यादीतून ३२८ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. १५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी ३१९ उमेदवार उपस्थित राहिले. परीक्षेचे नियोजन करताना उमेदवारांची ओळख पडताळणी, बैठक व्यवस्था, परीक्षा साहित्य वितरण तसेच सुरक्षा व्यवस्था याबाबत आवश्यक खबरदारी घेण्यात आल्यामुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रिया शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने पार पडली.
दरम्यान, पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून ती कार्यालयाच्या दर्शनी भागावरही लावण्यात आली आहे. उमेदवारांना या उत्तरतालिकेबाबत काही आक्षेप किंवा हरकती असल्यास त्या २४ तासांच्या आत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे दूरध्वनी संदेशाद्वारे अथवा विद्युतीय पत्राद्वारे कळवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. निर्धारित कालावधीनंतर येणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलातर्फे भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष आणि गुणवत्ताधिष्ठित पद्धतीने राबविण्यात येत असून सर्व टप्प्यांत शासनाच्या नियम व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन केले जात असल्याचेही पोलीस प्रशासनाने नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis