
रत्नागिरी, 15 मार्च, (हिं. स.) : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असून घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडर तसेच पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत सातत्याने वाढ करून केंद्र व राज्य सरकार सामान्य जनतेवर अतिरिक्त आर्थिक बोजा टाकत असल्याचा आरोप करत दरवाढीवर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या चिपळूण तालुका पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
पेट्रोलियम पदार्थ व गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात चिपळूण काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना निवेदन दिले. तालुकाध्यक्ष महादेव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या महागाई आणि बेरोजगारी वाढली असून शिक्षण फी, घरपट्टी, पाणीपट्टी व वीजबिलातही मोठी वाढ झाली आहे. या परिस्थितीत इंधन व गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे मासिक अर्थकारण कोलमडून गेले आहे. तसेच या वाढत्या महागाईला केंद्रातील भारत सरकारच्या धोरणांना जबाबदार धरत सरकारने तातडीने दरवाढीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी महिला तालुकाध्यक्षा निर्मला जाधव, तालुका उपाध्यक्ष संजय जाधव, ज्येष्ठ काँग्रेस नेते मुजफ्फर सय्यद, सुरेश पाथरे, अजित शिंदे, महिला शहराध्यक्षा वीणा जावकर, नगरसेविका सफा गोठे, विनायक जाधव, दिनेश माटे, सुनील खेडेकर, महिला सेवादल तालुकाध्यक्षा नंदा भालेकर तसेच रत्नागिरी सेवादल जिल्हाध्यक्ष तुळशीराम पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी