मुंबई महापौरांच्या गाडीवरील फ्लॅश दिव्यांवरून वाद
मुंबई, 15 मार्च (हिं.स.)। मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यांच्या नव्या अधिकृत गाडीवर लावण्यात आलेल्या लाल-निळ्या फ्लॅश दिव्यांमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून विरोधकांनी यावरून जोरदार टीका सुरू के
Controversy Flashing Lights Mumbai Mayor's Car


मुंबई, 15 मार्च (हिं.स.)। मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यांच्या नव्या अधिकृत गाडीवर लावण्यात आलेल्या लाल-निळ्या फ्लॅश दिव्यांमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून विरोधकांनी यावरून जोरदार टीका सुरू केली आहे. केंद्र सरकारने मे 2017 मध्ये सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिव्याच्या वापरास बंदी घातली होती. व्हीआयपी संस्कृतीला आळा घालण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयानंतर बहुतांश सरकारी वाहनांवरील लाल दिवे हटवण्यात आले होते. मात्र, महापौरांच्या नव्या वाहनावर पुन्हा लाल-निळे फ्लॅश दिवे दिसल्याने नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणावरून महापौरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले की, “नियमांना ब्रेक आणि महापौरांच्या गाडीला झगमगाट, मुंबईत व्हीआयपी संस्कृतीची पुन्हा एन्ट्री झाली आहे का?” त्यांनी असा आरोप केला की महापौरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केले असून केंद्र सरकारच्या निर्णयालाही हरताळ फासला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीआयपी संस्कृती संपवण्याचा निर्णय घेतला असताना मुंबईच्या महापौरांना मात्र त्याचा मोह आवरला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, ठाकरे गटाच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत महापौरांच्या भोवती सतत निर्माण होणाऱ्या वादांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कधी घड्याळ, कधी गाडी तर कधी वक्तव्यांवरून महापौर चर्चेत येत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, “नवनिर्वाचित महापौरांच्या विरोधात नक्की काय चाललंय?” असा सवाल करत भाजपमधील अंतर्गत गटबाजीवरही अप्रत्यक्षपणे बोट ठेवले.

दरम्यान, हा वाद वाढत असतानाच पालिका प्रशासनाने महापौरांच्या अधिकृत गाडीवरील लाल-निळे फ्लॅश दिवे काढून टाकल्याची माहिती दिली आहे. नियमांचे पालन करत हे दिवे हटवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सध्या महापौरांच्या वाहनावर कोणतेही विशेष दिवे नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. तसेच, महापालिकेतील इतर काही पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवर बसवलेले अशाच प्रकारचे दिवेही प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर दोन दिवसांपूर्वीच काढून टाकण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणावरून निर्माण झालेला राजकीय वाद मात्र अजूनही कायम असल्याचे चित्र दिसत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande