युद्ध थांबवण्यासाठी इराण इच्छुक,पण अमेरिका अजून तयार नाही - ट्रम्प
वॉशिंग्टन , 15 मार्च (हिं.स.)। मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या तरी इराणसोबत युद्ध समाप्त करण्यासाठी कोणत्याही करारास तयार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, इराण करार करू
युद्ध थांबवण्यासाठी इराण इच्छुक,पण अमेरिका अजून तयार नाही- ट्रम्प


वॉशिंग्टन , 15 मार्च (हिं.स.)। मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या तरी इराणसोबत युद्ध समाप्त करण्यासाठी कोणत्याही करारास तयार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, इराण करार करू इच्छित आहे, मात्र सध्या असलेल्या अटी पुरेशा नाहीत. तथापि, त्या अटी नेमक्या काय असतील याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, जर कोणताही करार झाला तर त्यामध्ये इराणने आपला अणु कार्यक्रम पूर्णपणे बंद करणे ही अट निश्चितपणे असेल. त्यांनी असेही सांगितले की, स्ट्रेट ऑफ होर्मुजच्या सुरक्षेसाठी ते अनेक देशांसोबत मिळून योजना तयार करत आहेत. हा समुद्री मार्ग तेलवाहू जहाजांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. युद्धामुळे या मार्गावर तणाव वाढल्याने जगभरात तेलाच्या किंमती वाढल्या आहेत.

ट्रम्प यांनी सांगितले की अनेक देशांनी या जलमार्गाच्या सुरक्षेसाठी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया आणि युनायटेड किंगडम यांसारखे देशही जहाजांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी आपली युद्धनौका पाठवू शकतात, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

ट्रम्प यांनी हेही पुष्टी केली की अमेरिकन सैन्याने इराणमधील महत्त्वाच्या तेल केंद्र असलेल्या खार्ग बेटावर हल्ला केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात बेटावरील अनेक भाग नष्ट झाले, मात्र तेल पाइपलाइन आणि ऊर्जा पायाभूत सुविधांचे पूर्ण नुकसान करण्यात आले नाही, जेणेकरून त्यांची पुन्हा उभारणी शक्य राहील.

या युद्धाची सुरुवात २८ फेब्रुवारी रोजी झाली, जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ले केले. त्यानंतर इराणनेही इस्रायल आणि अमेरिकेच्या ठिकाणांवर प्रत्युत्तरात्मक हल्ले सुरू केले. या संघर्षात आतापर्यंत अनेक लोकांचा मृत्यू झाला असून अमेरिकन सैन्याचे १३ जवानही ठार झाले आहेत.

ट्रम्प यांनी दावा केला की अमेरिकन हल्ल्यांमध्ये इराणच्या अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोन प्रणाली नष्ट करण्यात आल्या असून येत्या काही दिवसांत इराणची लष्करी ताकद आणखी कमकुवत केली जाऊ शकते.

दरम्यान, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबतही ट्रम्प यांनी प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, ते अद्याप सार्वजनिकरीत्या समोर आले नसल्याने ते जिवंत आहेत की नाही हे स्पष्ट नाही.वाढत्या पेट्रोल दरांबाबत अमेरिकन नागरिकांच्या चिंतेलाही ट्रम्प यांनी फेटाळून लावले. युद्ध संपल्यानंतर तेल आणि गॅसच्या किंमती पुन्हा कमी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याशिवाय, ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांच्यावर टीका करत म्हटले की, युक्रेन युद्ध संपवण्यासाठी त्यांच्यासोबत करार करणे हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या तुलनेत अधिक कठीण आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande