
नाशिक, 16 मार्च (हिं.स.) : नाशिक महानगर पालिका आणि नववर्ष स्वागत समिती, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित केलेला ‘अंतर्नाद’ हा भारतीय शास्त्रीय संगीत, वाद्य आणि नृत्याचा भव्य कार्यक्रम गोदातीरी उत्साहात पार पडला.
सुरेल सादरीकरण, तालबद्ध वाद्यवृंद आणि आकर्षक नृत्याविष्कारामुळे हा सोहळा नाशिककर रसिकांना मंत्रमुग्ध करतो. ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या स्मरणोत्सवानिमित्त राष्ट्रगीताचे रचनाकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना समर्पित हा सांस्कृतिक सोहळा विशेष ठरला.
कार्यक्रमात भारतीय शास्त्रीय संगीताच्या विविध अंगांचा संगम सादर करण्यात आला. या भव्य सोहळ्यात १०२ गुरुकुलांमधील तब्बल १७८५ विद्यार्थी, त्यांचे गुरू आणि विविध कलाकार सहभागी झाले. लहान मुलांपासून ज्येष्ठ कलाकारांपर्यंत सर्व वयोगटातील कलाकारांनी आपली कलाकौशल्ये सादर करून उपस्थितांची मनं जिंकली.
या नेत्रदीपक सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते संदीप कुलकर्णी उपस्थित होते, ज्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. कार्यक्रमास महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री आणि जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांची उपस्थिती लाभली.
भारतीय संस्कृती, परंपरा आणि शास्त्रीय संगीताचा संगम असलेल्या ‘अंतर्नाद’ कार्यक्रमाने नाशिकच्या सांस्कृतिक परंपरेला नवी झळाळी दिली. कार्यक्रमाला उपस्थित नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलाकारांचे भरभरून कौतुक केले.-------------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV