
नवी दिल्ली, 16 मार्च (हिं.स.)। सलग तीन व्यापारी दिवस मोठ्या घसरणीचा सामना केल्यानंतर सोमवारी देशांतर्गत शेअर बाजाराने दमदार पुनरागमन केले. दिवसभर चढ-उताराच्या स्थितीनंतर शेवटच्या तासात झालेल्या जोरदार खरेदीमुळे बाजारात मोठी उसळी दिसून आली. दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स ९३८.९३ अंकांच्या वाढीसह ७५,५०२.८५ या स्तरावर बंद झाला, तर एनएसई निफ्टी २५७.७० अंकांनी वाढून २३,४०८.८० या पातळीवर स्थिरावला. या वाढीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात सुमारे ७५ हजार कोटी रुपयांची भर पडली.
सोमवारी बाजाराची सुरुवात मात्र कमकुवत झाली होती. सेन्सेक्स १४८.१३ अंकांनी घसरत ७४,४१५.७९ या स्तरावर उघडला. सकाळच्या सत्रात खरेदी-विक्रीच्या ओढाताणीत बाजारात मोठी हालचाल दिसली. विक्रीचा दबाव वाढल्यामुळे दुपारच्या सुमारास सेन्सेक्स ६१४ अंकांनी घसरत ७३,९४९.७६ पर्यंत खाली आला. त्यानंतर बाजारात हळूहळू खरेदी वाढू लागली आणि दुपारनंतर गुंतवणूकदारांनी आक्रमक खरेदी केल्याने निर्देशांकाने जोरदार उडी घेतली. एका टप्प्यावर सेन्सेक्सने निचांकी स्तरापासून तब्बल १,८५५ अंकांची झेप घेत ७५,८०५.२७ पर्यंत मजल मारली. मात्र शेवटच्या क्षणी झालेल्या नफा-वसुलीमुळे निर्देशांक थोडा खाली येऊन दिवसअखेर मजबूत स्थितीत बंद झाला.
निफ्टीचीही दिवसभर अशीच स्थिती राहिली. सुरुवातीला तो ३५ अंकांनी घसरत २३,११६.१० वर उघडला आणि विक्रीच्या दबावामुळे २२,९५५.२५ या पातळीपर्यंत खाली आला. मात्र अखेरच्या तासात झालेल्या मोठ्या खरेदीमुळे निफ्टीने निचांकी स्तरापासून सुमारे ५४६ अंकांची झेप घेतली आणि दिवसअखेर २३,४०८.८० या पातळीवर बंद झाला.
आजच्या व्यवहारात ऑटोमोबाइल, बँकिंग आणि मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि एफएमसीजी निर्देशांकही मजबूत स्थितीत बंद झाले. दुसरीकडे मीडिया, ऑइल अँड गॅस आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसून आला. रियल्टी, कॅपिटल गुड्स, आयटी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्येही घसरण झाली. विस्तृत बाजारात मात्र दबाव कायम राहिल्याने मिडकॅप निर्देशांक ०.२७ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.५३ टक्क्यांनी घसरला.
दिवसभरात बीएसईवर ४,५३७ शेअर्समध्ये व्यवहार झाले. त्यापैकी १,५०९ शेअर्स वाढीसह तर २,८६० शेअर्स घसरणीसह बंद झाले. एनएसईवरही बहुतेक शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला असला तरी प्रमुख निर्देशांकांमध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे बाजाराने दिवसअखेर मजबूत पुनरागमन नोंदवले.
दिवसभर खरेदी-विक्री झाल्यानंतर, शेअर बाजारातील आघाडीच्या समभागांमध्ये, अल्ट्राटेक सिमेंट ४.५५ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ३.५८ टक्के, ग्रासिम इंडस्ट्रीज ३.३४ टक्के, ट्रेंट लिमिटेड ३.११ टक्के आणि एटरनल २.९५ टक्के वाढले आणि आजच्या टॉप ५ गेन्सर्सच्या यादीत सामील झाले. दुसरीकडे, भारत इलेक्ट्रॉनिक्स २.२५ टक्के, मॅक्स हेल्थकेअर १.९६ टक्के, कोल इंडिया १.४३ टक्के, ओएनजीसी १.३८ टक्के आणि विप्रो १.२५ टक्क्यांनी घसरले आणि आज टॉप ५ गेन्सर्समध्ये समाविष्ट झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule